रत्नागिरी – जंगली खवल्या मांजराच्या खवल्याची तस्करी करणार्या इम्रान अहमद मुलाणी व दिनेश गोपाळ डिंगणकर या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली दोघांकडून ११ लाख ८७ हजाराचे खवले जप्त केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. सहायक निरीक्षक संदीप शिंदे व अंमलदारांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना सांगली येथे कुपवाड ते अहिल्यानगर रस्त्यावर शिवमुद्रा चौकात दोघेजण दुर्मिळ संरक्षित व नामशेष होत असलेल्या खवल्या मांजराचे खवले विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली.
पथकाने वन अधिकार्यासमवेत शिवमुद्रा चौकात सापळा लावला. दोघे संशयित आले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडून ठेवले. दोघांची झडती घेतली असता इम्रान मुलाजी याच्या पाठीवरील सॅकमध्ये एका गोणीमध्ये खवले मिळाले. जंगली खवल्या मांजराच्या अंगावरील खवले असून त्याच्या विक्रीसाठी आल्याचे दोघांनी सांगितले. खवल्याचे वजन ४ कि. ७५० ग्रॅम असून किंमत ११ लाख ८७ हजार ५०० रुपये इतकी आहे. दोघांविरुध्द कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.