54

सांगली – पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला न्यायालयात शिक्षा होण्यासाठी तपास यंत्रणेने योग्य दिशा, अचूक पुरावे आणि प्रभावी तपासाची सांगड घालणे महत्त्वाचे असते. बामणोळी येथील सुनंदा कुमार जाधव हत्याप्रकरणात तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी केलेल्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. तपासातील योग्य नियोजन आणि तपासाची प्रभावी मांडणी यामुळे आरोपी कुमार भीमराव जाधव (वय 38 वर्षे, बामणोळी दत्तनगर, कुपवाड) याला सांगली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.एस. काकडे यांनी हा निकाल दिला.
बामणोळी येथे 5 ऑक्टोबर 2022 रोजी ही घटना घडली होती. सुनंदा कुमार जाधव (वय 30) असे मृत महिलेचे नाव आहे. तीन मुली असल्याने मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तसेच माहेरून पैसे आणण्याच्या मागणीवरून आरोपी पती पत्नीचा छळ करीत होता. याच वादातून आरोपीने बांबूने सुनंदा यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी केला. त्यांनी तपासाची योग्य दिशा निश्चित करून प्रकरणातील पुरावे आणि तपासाची प्रक्रिया न्यायालयीन खटल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरवली. अखेर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, तर दंड न भरल्यास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. तपास तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी केला. प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे आणि पोलीस कर्मचारी यास्मीन रियाज शेख यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here