गुहागर – अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या नासा, इस्त्रो संस्थांना भेटी देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीसाठी गुहागर तालुक्यातील १९७ जिल्हापरिषदेच्या शाळांमधील २६४१ विद्यार्थ्यांची गुहागरच्या शिक्षण विभागाकडून जोरदार तयारी करवून घेतली जात आहे.
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्यामाध्यमातून शिक्षकांना विशेष मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली जात आहे. या दौऱ्यासाठी आपल्या विद्यार्थ्याची शिक्षक व पालक यांनी सजग राहुन विशेष तयारी करून घेण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांनी केले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधून अनेक विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमधून अव्वल दर्जाचे अधिकारी घडत आहेत. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक, वैज्ञानिक किंवा संशोधक घडण्याची क्षमता आहे. अशा विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांच्यातील कलागुणांना वा देण्यासाठी शिक्षण विभागाने नासा, इस्त्रोसारख्या संशोधन संस्था विद्यार्थ्यांना पाहता याव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या संकल्पनेतून व शिक्षण अधिकारी प्राथमिक वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदीप कडव यांच्या मार्गदर्शनाखाली नासा, इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांना निवड चाचणी मध्ये सहभाग घेण्याकरिता तालुकास्तरावर जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून ७० लाख रूपयांची तरतुद केली आहे. या उपक्रमासाठी अभ्यासू विद्यार्थी निवडले जाणार
आहेत.
केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हा अशा चार स्तरावर निवड परिक्षा घेऊन नासासाठी ९ तर इस्त्रोसाठी २७ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. गुहागर तालुक्यातून ३ विद्यार्थी जिल्हा पातळीवर दयावयाचे आहेत. यासाठी गुहागरच्या गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे काम जोरात सुरू आहे. नुकतीची पालक, सरपंच यांची एकत्रीत बैठक घेऊन गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लीना
भागवत मार्गदर्शन केले आहे. शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन सुची तयार केली आहे. विद्यार्थ्यांसाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी मार्गदर्शनाची युटयुब क्लीप तयार करून प्रसारीत करत आहेत. विशेष तासिका घेऊन विद्यार्थ्यांना या निवड परिक्षेला सामोरे जाण्यासाठी तयार केले जात आहे. जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना दिलेली ही सुवर्ण संधी असून याचा विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याला लाभ उठवून देण्यासाठी
सहकार्य करावे असे आवाहन लीना भागवत यांनी केले आहे.