चिपळूण – चिपळूण अर्बन बँकेच्या संगणक विभागप्रमुखाविरोधात ३७ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल रमेश सुर्वे याला ताब्यात घेण्यात आले.
याबाबतची फिर्याद मुख्य व्यवस्थापक संतोष विजय देसाई यांनी दिली आहे. हा प्रकार ८ सप्टेंबर २०२० ते १ ऑगस्ट २२ या कालावधीत घडला आहे. राहुल सुर्वे याने अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर फिर्याद देण्यात आली. त्यानुसार राहुल रमेश सुर्वे हा चिपळूण अर्बन बँकेत संगणक विभाग प्रमुख म्हणून काम करताना पासवर्डचा वापर करून हेतुपुरस्सर खातेदारांच्या बँक खात्यातील ३७ लाख ७५ हजार ४५ रुपये २० पैसे इतक्या रकमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार राहुल सुर्वे याला ताब्यात घेतले, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे तपास करत आहेत.
चिपळूण अर्बन बँकेच्या संचालकांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यास एवढा उशीर का लावला ..? याची खुमासदार चर्चा सध्या चिपळूण परिसरात सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी जर या कर्मचाऱ्यांनी अपहार केला हे लक्षात आले होते तर एवढे दिवस गुन्हा का दाखल केला नाही याचा खुलासाही बँकेने करावा अशी मागणी आता जोर धरत आहे.