चिपळूण ; वाशिष्ठी दूध प्रकल्प लवकरच ग्राहकांच्या सेवेत

0
124
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत रुजू होत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव काम केले आहे. या क्षेत्रातून त्यांनी गरजूंना सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा करतांना सुशिक्षित तरुणांना व्यवसायासाठीदेखील वेळेत कर्ज पुरवठा करून स्वावलंबी बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. मात्र, कोकणातील शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, ही त्यांची भूमिका नेहमीच होती. त्यांच्याच मार्गदर्शनातून पिंपळीखुर्द येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची मुहूर्तमेढ करण्यात आली. दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन तयार करण्यात आले असून अतिशय दर्जेदार आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे हे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांचा विश्वास नक्की सार्थ ठरवतील, अशी आम्हाला खात्री आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असतानाच स्थानिक शेतकऱ्यांकडून दुध संकलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्या माध्यमातून मालघर, पिंपळीखुर्द (ता. चिपळूण) आंबडस, चिंचघर दस्तुरी (ता. खेड) या ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संकलन केंद्रातून दररोज १० हजार लिटर दुध जमा होत आहे. या संकलन केंद्रांना शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून शेतकऱ्यांच्या दुधाला वाशिष्ठी डेअरीने उत्तम दर दिला आहे. त्यामुळे शेतकरीही या प्रकल्पामुळे समाधानी आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.या प्रकल्पाच्या अनुषंगाने असणाऱ्या व्यवस्थेतून अनेकांना रोजगार मिळणार आहे आणि तोच आमचा हेतू असल्याची भूमिका यावेळी स्पष्ट केली. हा प्रकल्प आता कोकणवासियांच्या सेवेत रुजू होत असून पहिल्या टप्प्यात ‘मिल्क पाऊच’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नंतर टप्प्याटप्प्याने दुग्धजन्य पदार्थ देखील उपलब्ध करून दिली जाणार असून या प्रकल्पाला कोकणातील जनतेने आणि ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन वाशिष्टी डेअरीने केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here