गुहागर – राज्यात शिवसेनेमध्ये झालेले बंड आणि सत्तांतराचा परिणाम आता सर्वच भागात जाणवू लागला आहे, त्यातही शिंदे गटाकडून मोठ्या हालचालींना वेग आलाय.
उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेची धुरा आक्रमकपणे सांभाळणाऱ्या गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत आणि रामदास कदम यांचे जोरदार प्रयत्न सुरू झालेत असे चित्र आहे.मागील दोन महिन्यात गुहागर तालुक्यातील अनेक युवा पदाधिकारी आणि सरपंच मोठ्या प्रमाणात रत्नागिरी वारी करत उद्योजक आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची भेट घेत तालुक्यात शिंदे गटाचे म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे काम सुरू केलं आहे. या सगळ्याचा आमदार भास्कर जाधव यांच्यावर कितपत परिणाम होतोय हे पुढील काळात पाहावं लागणार आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदे गटासह भाजपला तालुक्यात खातेही उघडू दिले नव्हते,एव्हढंच काय तर भाजपचा बालेकिल्ला असलेली अंजवेल ग्रामपंचायत देखील भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेने काबीज केली होती. यासगळ्या घामोडींच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शिंदे गट पुन्हा एकदा जोरदार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद च्या पडवे गटातील जवळपास अकरा सरपंचांनी नुकतीच पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असल्यामुळे भास्कर जाधव यांच्या समोर आव्हान निर्माण झालं आहे.त्यामुळे गुहागर तालुक्यात पुढील काळात राजकीय उलथपालथी ना वेग येण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.चौकड – पुढील महिन्यात येऊन घातलेली 21 ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाला घवघवीत यश मिळेल अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे उप जिल्हा प्रमुख प्रभाकर शिर्के यांनी दिली आहे. प्रभाकर शिर्के हे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख असून गेली अनेक वर्षे गुहागर मधील शिवसेना वाढवण्यात त्यांचे मोठं योगदान आहे. मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे प्रभाकर शिर्के हे शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडींचा भास्कर जाधव यांना कितपत परिणाम होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे रामदास कदम तर दुसरीकडे जिल्ह्यातील किंगमेकर म्हणून ओळख असलेले किरण सामंत हे दोघेही गुहागर मध्ये पडद्या आडून सक्रिय झाल्यामुळे भविष्यातील राजकारणात गुहागर मध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल अशी चिन्हे आहेत.