गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस मतलई वारे वाहू लागले असले तरी हवामान विभागाने ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे बागायतदार धास्तावले आहेत.
याचा परिणाम आंब्यावर तुडतुड्याचा अटॅक होऊ शकतो. यंदा दिवाळीत थंडीचे आगमन झाले, पण त्यात सातत्य नाही. गेले दोन दिवस किमान तापमानात चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेली पालवी जुन कधी होणार हा प्रश्न बागायतदारांपुढे आहे. वातावरणाची साथ मिळाली नाही तर हंगाम पंधरा दिवस पुढे जाईल.नैऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे १४ १५ या कालावधीत कोकणात आकाश ढगाळ राहून रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३३ ते ३४ आणि किमान तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील असा अंदाज कोकण कृषी विद्यापिठाकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेले चार दिवस १३ ते १५ अंशावर स्थिरावलेले किमान तापमान रविवारी (ता. १३) २० अंशावर गेल्याने याचा परिणाम हापूसच्या कलमांवर होणार आहे. मागील आठवड्यात किमान तापमान दापोलीत १३.२ अंशापर्यंत खाली आले होते. बदलत्या वातावरणामुळे पारा २० अंशापर्यंतवर येऊ शकतो. बदलत्या वातावरणाचा परिणाम निश्चित आंबा पिकावर होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा बागेत कोवळ्या पालवीवर मिज माशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. शेंडे पोखरणारी अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते आणि आतील भाग पोखरुन खाते. परिणामी किडग्रस्त फांदी सुकून जाते. प्रादुर्भित भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात. तशी परिस्थिती निर्माण झाल्यास बागायतदारांना किटकनाशकांची फवारणी करावी असा सल्ला कृषी विद्यापिठाने दिला आहे. पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडा दिसू शकतो. आंबा बागेत जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी छाटणी केलेल्या झाडाचे खोडकिडीपासून संरक्षण करण्याचे आव्हान बागायतदारांपुढे आहे.