खेड – मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसी मधील डिवाईन केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाबाबतची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. ही माहिती मुद्दाम लपवली जात आहे की काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जर कंपनीत स्फोट कसा झाला याची माहिती कंपनी व्यवस्थापन किंवा प्रशासन देत नसेल तर माहिती लपविण्यामागे नक्की कारण काय असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.दरम्यान, सोमवारी अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी कंपनीला भेट देत पाहणी केली. भाजलेल्या रुग्णांची प्रकृती, अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीयाबाबत कसलीच माहिती कंपनीकडून अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.रविवार, दि. १३ रोजी लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील डिवाईन केमिकल या कंपनीत फॅब्रिकेशन कामातील वेल्डिंग करण्याचे काम सुरू असताना त्याची ठिणगी उडून जवळच असणाऱ्या रासायनिक पदार्थाने पेट घेतला व स्फोट झाला. यात दिलीप शिंदे (रा. घाणेखुंट), मयूर खाके (रा.चोरवणे), संदीप गुप्ता (रा. उत्तरप्रदेश), विपलब मंडल (रा. पश्चिम बंगाल), विनयकुमार मौर्या (रा. जोनपूर, उत्तरप्रदेश), गुड्डू मौर्या (रा. बनावरस, उत्तरप्रदेश), सतीशकुमार मौर्या हे जखमी झाले आहेत. यातील पाचजण गंभीर असून, त्यांच्यावर ऐरोली, नवी मुंबई येथे उपचार सुरू आहेत.दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे उपचारार्थ दाखल केलेल्यांच्या कामगारांवर योग्य ते उपचार सुरू असून, त्यातील एका कामगाराचा मृत्यू देखील झाला आहे. तर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन कामगारांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या स्फोटानंतर खेडच्या तहसीलदार, प्रांताधिकारी, उपविभागीय दांडाधिकारी, कोल्हापूर येथील फॅक्टरी इन्स्पेक्टर व अन्य शासकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी कंपनीत भेट दिल्याचे कळते.