चिपळूण- चिपळूण शहरातील अनेक काम ही नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहेत. याआधी शहरातील बंदिस्त गटारे ,शहरातील स्ट्रीट लाईट ,शहरातील नवीन बाजार फुल याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आता मात्र पुन्हा असाच काहीसा प्रकार शहरातील एका शौचालय बांधकाम प्रकरणी उघड झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील पेठमाप येथील शौचालयाच्या बांधकामासाठी मातीमिश्रित वाळू वापरण्यात आल्याने आणि लाद्या व अन्य साहित्य कमी दर्जाचे वापरल्याने वादग्रस्त बनला होता. मात्र, आता हेच शौचालय वेगळ्याच मुद्यासाठी चर्चेत आले आहे. सुमारे १८ लाख रुपयांच्या शौचालयात १० रुपयांचा प्लास्टिकचा नळ जोडल्याने या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.चिपळूण शहरातील पेठमाप परिसर दाटीवाटीचा असल्याने वैयक्तिक शौचालये उभारणे येथे शक्य नाही. नागरिकांची गरज ओळखून नगर परिषदेने काही वर्षापूर्वीच येथे सार्वजनिक शौचालय उभारले होते. ते नादुरुस्त झाल्याने नव्याने बांधण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी आपल्या ५८/२ या विशेष अधिकाराचा वापर करून या शौचालयासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, इनायत मुकादम यांनी या कामावर आक्षेप घेततक्रार केल्याने काम रखडले होते. नागरिकांची गरज ओळखून मुख्याधिकारी शिंगटे यांनी प्रलंबित प्रशासकीय बाबी पूर्ण करून हे काम करण्याचे ठेकेदाराला आदेश दिले.त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे १८ लाख रुपये खर्च करून हे काम घाईघाईने कमी कालावधीत करण्यात आले. मुकादम यांनी पुन्हा कामाच्या दर्जावर आक्षेप घेतला. काम अंदाजपत्रकानुसार होत नसून त्याची चौकशी करण्याची मागणीमुख्याधिकारी शिंगटे यांच्याकडे केली होती.नगर परिषदेकडून शौचालय व त्या संबंधित सुविधा देण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र, आठ सीटच्या शौचालयासाठी बसविण्यात आलेले नळ १० रुपयांचे प्लास्टिकचे बसविण्यात आले आहेत. त्यातच नवीन शौचालयाची साफसफाईही वेळोवेळी केली जात नसल्याने अनागोंदी कारभारच चव्हाट्यावर आला आहे.मागील दोन वर्षात सार्वजनिक शौचालयांची जागोजागी कामे झाली. या शौचालयांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. परंतु, सर्व कामे बोगस झाली आहेत. तेव्हा मागील दोन वर्षातील सर्व शौचालयांच्या कामाची चौकशी करण्यात यावी. याविषयी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहे.-इनायत मुकादम, माजी नगरसेवक, चिपळूण,