गुहागर – मुंबईतील प्रसिद्ध सोने- चांदी व्यापारी कीर्ती कोठारी हे सोमवारी रात्रीपासून रत्नागिरी राधाकृष्ण नाका येथून बेपत्ता झाले होते. ते गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. ते रत्नागिरीत ज्वेलर्सच्या दुकानात आपला सोने चांदीचा माल विकण्यास येतात. नेहमीप्रमाणे ते रत्नागिरीत आले होते. त्यांनी आपला मुक्काम आठवडा बाजार येथील एका लॉज मध्ये केला होता. सोमवारी रात्री ते एम जी रोड येथील एका ज्वेलर्स कडून राधाकृष्ण नाक्यापर्यंत चालत आल्याचे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानुसार पोलिस त्यांचा शोध घेत होते. मात्र आता त्यांचा मृतदेह गुहागर आबलोली मार्गावरील खोदडे पुलाखाली एका गोणी मध्ये सापडला आहे. त्याचा खून झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरीत वास्तव्याला थांबलेल्या कोठारी यांचा मृतदेह गुहागर येथे गोणी मध्ये कसा सापडला ? याचे गूढच आहे. कुणी आणि का त्यांना मारलं असावं. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा सारा उलगडा पोलिस तपासातच उघड होणार आहे.