लांजा – (राहुल वर्दे ) – मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील काजळी नदीत गॅस वाहतूक करणारा कंटेनर कोसळल्यानंतर गेल्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या ३० तासांपासून अधिक काळ बंद ठेवण्यात आलेली आहे.
सध्या महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यायी मार्ग म्हणून देवधे काजरघाटी मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. तर टँकरमधील वायू गळती रोखण्यासाठी भारत गॅसच्या उरण आणि गोवा येथील तज्ज्ञांची टीम तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम आंजणारी येथे दाखल झाली. सायंकाळी सहा नंतर अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसर्या टॅंकर मध्ये पास करण्यास सुरुवात झाली होती.
मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथे गॅस वाहतूक करणारा कंटेनर नदीत कठडा तोडून खाली कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी २.४८ वाजण्याच्या दरम्याने घडली होती. या घटनेनंतर गॅस टँकर मधून एलपीजी गॅस ची गळती लागल्याने गुरुवारी सायंकाळपासूनच महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी देखील सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे गेल्या ३० तासापासून मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. या दुर्घटनेतील टॅंकर मध्ये १८ टन एलपीजी वायू होता. या टँकरमधील गळती रोखण्यासाठी गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अग्निशमन दलाचे आनंद राऊत, संदीप कुळ्ये, राजेंद्र महाडिक, कैलास बुधवंत यांनी नदीत उतरून गॅस गळती बंद केली होती. याबरोबरच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे धनंजय गीध, विजय भोसले हे गॅस व केमिकल तज्ञ या ठिकाणी उपस्थित झाले होते. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता तीसरी क्रेन दाखल झाली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टॅंकर गॅस पास करण्यायोग्य करण्यात आला. ६ नंतर अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस दुसर्या टॅंकर मध्ये पास करण्यास सुरुवात झाली होती. यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे धनंजय गीध, विजय भोसले हे गॅस व केमिकल तज्ञ तसेच भारत पेट्रोलियमच्या उरण आणि गोवा येथील टीम यामध्ये मनोज पाटील, मनोज ग. पाटील, दत्ताराम पाटील व भालचंद म्हात्रे यांचा समावेश आहे.