मुंबई – कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही काळ रुसलेली लालपरी दोन वर्षांनंतर सध्या सुसाट धावत आहे . श्रावणात भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी दर सोमवारी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती .
तसेच गणेशोत्सवात आणि गणेशोत्सवाच्या सुटीमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे . ऑगस्टमध्ये ९ कोटी जणांनी एसटीने प्रवास केला असून ४५० कोटींचे उत्पन्न मिळाले आहे . कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते . एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला . एसटी महामंडळाकडून श्रावण महिन्यात विशेष बस सोडण्यात आल्या . श्रावणात एसटी बस त्र्यंबकेश्वर व भीमाशंकरसाठी सोडण्यात आल्या . तसेच इतर दिवशी काही मोजक्या जादा गाड्या सोडल्या . भक्तांना श्रावण महिन्यात देवदर्शन करता यावे यासाठी सर्व प्रमुख देवदर्शनस्थळी विशेष बस सोडण्यात आल्या होत्या . त्या प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला , असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले . तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘ गणपती स्पेशल ‘ ३ हजार ४१४ बसद्वारे सुमारे १ लाख ५० हजार प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला .