गुहागर – गणेशोत्सवासाठी मुंबई नालासोपारा येथून गुहागर तालुक्यातील उमराठे गावामध्ये येणाऱ्या मुंबई चाकरमान्यांच्या एसटीला खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिल्याने अपघात घडला आहे.
यामध्ये ७ ते ८ जणांना डोक्याला व तोंडाला मार बसला असून इतर किरकोळ जखमी आहेत. हा अपघात पिंपळ जामसुत रस्त्यावर जामसुत सीमेवर पहाटे ६.३० मिनिटांनी घडला. मुंबई नालासोपारा येथून गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील घाडेवाडी व मराठवाड्यातील गणेश भक्त चाकरमाने एसटी महामंडळाची स्वतंत्र गाडी करून गावी येत होते. जमसुत पिंपर या मार्गावर जामसुत सीमेवर समोरून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स ने धडक दिली. चालकाच्या बाजूने धडक दिल्याने झोपेत असलेल्या प्रवाशांना चांगला दणका बसला. एसटीमध्येच समोरील सीटवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला व नाकाला मार बसला आहे, व इतरांना किरकोळ मार्ग बसला आहे . असे एकूण 17 जणांवर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रामधे उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यावर ठोकर देणाऱ्या खाजगी ट्रॅव्हलच्या चालकाने आपले वाहन घेऊन पलायन केले आहे सर्व अपघातग्रस्तांना गावातील ग्रामस्थांनी उपचारासाठी हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. त्यांच्यावर अधिक उपचारासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय टीम हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. उमराठ गावचे सरपंच जनार्दन आंबेकर व ग्रामस्थांनी सर्व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.