चिपळूण- माती दगड-गोटे यामुळे गुदमरलेली वाशिष्ठी नदी हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागली आहे. जलसंपदा विभागाकडून काही दिवसातच मोठी यंत्रसामुग्री दाखल झाली. सध्या १२ पोकलेन, ३३ डंपर व ५ डोझरच्या साह्याने गाळ काढण्याचे काम वेगात सुरू झाले असून दिवसाला एक हजार ते दोन हजार घनमीटर गाळ काढला जात आहे. येत्या काही दिवसात वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी आणखी काही यंत्रसामुग्री दाखल होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
चिपळूण बाजार समितीचे दिनांक ६ डिसेंबरपासून महापूर, वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढणे, लाल व निळी पूररेषा रद्द करावी, अशा११ मागण्या घेऊन प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला २८ दिवस झाले. दरम्यानच्या काळात मंत्रालयामध्ये विविध खात्याच्या बैठका झाल्या होत्या. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोअर कमिटी बरोबर बैठक घेऊन वस्तुस्थितीची पाहणीही केली. याबाबतीत जलसंपदा अधीक्षक अभियंता वैशाली नारकर या मुख्य अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता जलसंपदा जगदीश पाटील, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, जलसंपदा उपविभागीय अभियंता विपुल खोत, उपविभागीय अभियंता यांत्रिकी विभाग दादासाहेब जाधव, कनिष्ठ अभियंता विष्णू टोपरे यांच्यासह विनंती पत्र घेऊन उपोषण स्थळी आल्या होत्या. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून १२ पोकलेन, ३३ डंपर व ५ डोझरची यंत्रणा कामाला लागली आहे. याशिवाय येत्या एक-दोन दिवसात शिवनदी व बहादूरशेख ते पिंपळी दरम्यानचा गाळ काढण्यासाठी ७ पोकलेन व २० डंपरची यंत्रणा चिपळुणात दाखल होणार असल्याची माहिती दिली होती. यामुळे उपोषणकर्त्यांनी चिपळूण बचाव समितीने उपोषण थांबवावे, अशी विनंती केली आहे. सध्या शहरातील पेठमाप-नाईक कंपनीच्या बाजूने, पेठमाप-वालोपे बाजुने व बहादूरशेख नाका याठिकाणी १२ पोकलेन, ३३ डंपर आणि ५ डोझर अशा ५० यंत्रसामुग्री मार्फत वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगर पालिकेमार्फत दर्शविलेल्या जागेवर हा गाळ टाकला जात आहे.