गुहागर – मुंबई ते गोवा या सागरी मार्गावरील अलिशान प्रवास सुरु झाला असून याचा फायदा आता गुहागरला ही मिळणार आहे. मुंबई ते गोवा या प्रवासात या अलिशान क्रूझला गुहागर तालुक्यातील वेलदूर येथे थांबा मिळाला असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जेटीचे काम वेलदूर येथे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुहागरचे आम. भास्कर जाधव यांनी शृंगारतळी येथे पत्रकारांना दिली.
कोकण किनारपट्टीवरील सागरी निसर्गसौदर्याचा आस्वाद घेत या अलिशान क्रुझ मधून सर्व सुखसोयींनी युक्त अशी ही सफर प्रवाशांसाठी उपलब्ध झाली आहे. मात्र मुंबई ते थेट गोवा अशी सोय असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या क्रुझला थांबा नव्हता. गुहागरचे आम. भास्कर जाधव यांनी संबंधितांशी चर्चा करून वेलदूर येथे या क्रूझला थांबा मंजूर करून घेतला आहे. त्यासाठी वेलदूर येथे जेटी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे माहितीही आम. भास्कर जाधव यांनी दिली.
क्रुझच्या या वेलदूर येथील थांब्यामुळे गुहागरच्या पर्यटन व्यवसायावर चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. गुहागर तालुक्यातील काही समुद्र किनाऱ्यावर प्रसिद्ध देवस्थाने असून या देवास्थानांही पर्यटकांना भेट देता येईल. गुहागरच्या पर्यटन क्षेत्रामध्ये चांगली वाढ व्हावी व येथील तरुणांना व व्यावसायिकांना रोजगार मिळावा यासाठी आम. जाधव पूर्वीपासूनच आग्रही आहेत. मुंबई – गोवा प्रवासावर या अलिशान क्रूझला वेलदूर येथे थांबा मिळाल्यास गुहागरच्या पर्यटन व्यवसायामध्ये मोठी वाढ होण्याची आशा येथील पर्यटन प्रेमींनी केली आहे.