चिपळूण – चिपळूण शहरातील सावकारांच्या पिळवणुकीला कंटाळून एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा निबंधकच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत चिपळुणातील दोन बड्या सावकारांचे परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे सावकारी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. शहर परिसरात १७ सावकारी परवानाधारक व्यावसायिक आहेत. त्यातील दोन जणांचे परवाने रद्द झाल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील सावकारी व्यवसाय करणारे शिवाजी खंडजोडे आणि चांगदेव खंडजोडे यांच्याविरोधात एका महिलेने चिपळूण पोलिस ठाणे तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या प्रकारानंतर येथील पोलिस यंत्रणा आणि सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधित सावकारी करणाऱ्या व्यावसायिकांच्या कार्यालयावर धाडी टाकून दस्तऐवज व अन्य समान जप्त केले होते. या सावकारांकडून कर्जदारांची लूट केली जात आहे. त्यांची मानसिक छळवणूक होत असून वेगवेगळ्या प्रकारे पिळवणूक होत असल्याची तक्रार या अर्जामधून करण्यात आली होती. अखेर त्याची गंभीर दखल घेत पोलिसांसह सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधित कार्यालयातील संगणक, दस्तऐवज व अन्य साहित्य जप्त केले. या पुराव्याच्या आधारे या सावकारांच्या कार्यालयात कर्जदारांकडून घेतलेले कोरे धनादेश व अन्य दस्तऐवज या पुराव्यानुसार त्यांचे परवाने रद्द केले आहेत. यामध्ये शिवाजी खंडजोडे यांचे एस. के. फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि चांगदेव खंडजोडे यांचे डी. के. फायनान्स या दोन फायनान्सचे परवाने जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांनी रद्द केल्याचे आदेश दिले आहेत.