श्रीवर्धन – शेअर मार्केटमध्ये दीर्घ मुदतीसाठी रक्कम गुंतवून २ टक्के परतावा देतो असे सांगुन सुमारे बारा पेक्षा अधिक गुंतवणुकदारांची फसवणुक करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकाराबाबत श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी मंझर उल्डे या आरोपीला अटक केली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लिपंचयतन येथील अब्दुल्ला दळवी यांनी आपली आपली फसवणुक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. आरोपी उल्डे याने अॅजेल ब्रोकिंगच्या माध्यमातून स्ट्रलिंग वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली ऑफिस सुरु करुन अनेकांची फसवणुक केली आहे. फिर्यादी दळवी यांनी सन २०१३ मध्ये उल्डे याच्याकडे पैसे गुंतविले होते आणि त्याच्या बदल्यामध्ये महिना २ टक्के व्याज मिळेल, असे उल्डे याने दळवी यांना सांगितले. त्याप्रमाणे पैसे देखील खात्यामध्ये जमा होत होते. त्यानंतर दळवी यांनी पुन्हा पाच लाख रुपयांची रक्कम पुन्हा टाकली.
अधिक व्याज मिळेल या हेतुने दळवी यांनी रक्कम गुंतविल्यानंतर कालांतराने व्याजाची रक्कम जमा होण्याचे बंद झाले. त्यानंतर दळवी यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर दळवी यांनी ज्याप्रकारे रक्कम गुंतविली होती. त्याचप्रकारे बारा जणांची सुमारे ४५ लाख रुपयांची गुंतवणुक आली असून उल्डे याने त्या सर्वांची फसवणुक केल्याचे पोलीसांच्या तपासात उघड झाले. यानंतर दिघी सागरी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी मंझर उल्डे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीसांकडून करण्यात येत आहे.