संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील आरवली ते वाकेड या टप्प्याचे अरिष्ट काही संपत नाही. महामार्गावरील या पट्ट्याचे काम दीर्घकाळ रेंगाळले आहे. ही बाब मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढेही गेली असून याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आरवली ते वाकेड या पट्ट्याचे काम ३१ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण होणार आहे, अशी माहिती सरकारमार्फत देण्यात आली संतोष येडगे यांच्या वतीने ॲड. राजदिप लहीरी यांनी बाजू मांडली.
महामार्गावरील २४१ ते २८१ या ४० किलोमीटरचे आरवली ते तळेकांटे या विभागाचे काम अपुरे असल्याने ते तत्काळ पुरे करण्याचा आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जदार संतोष येडगे यांनी केली होती. त्यांनी एम.ई.पी. संजोस आरवली कांटे रोड प्रा. लि. आणि इतर यांना प्रतिवादी केले होते. या कंपनीला आरवली ते कांटे या विभागाचे चौपदरीकरणाचे काम देण्यात आले होते, तर एम.ई.पी. संजोस कांटे-वाकेड रोड प्रा. लि. या कंपनीला कांटे ते वाकेड या विभागाचे काम देण्यात आले होते. १३ नोव्हेंबर २०१७ रोजी या कंपन्यांना काम देण्यात येऊन त्यांनी ते नियोजित वेळात पूर्ण करावयाचे होते. परंतु हे काम पूर्ण करण्यात या दोन्ही कंपन्यांना अपयश आले. परिणामी याबाबत जागृत नागरिक संतोष येडगे यांनी जनहित याचिका दाखल केली होती. प्रतिवादींना तसेच सरकारी खात्यांना रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश द्यावे, यासाठी त्वरित पावले उचलण्यासाठी आदेश करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. त्यावर राज्याचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी सांगितले की, उपरोक्त कंपन्यांना वेळेत काम करण्यात अपयश आल्याने त्यांची कंत्राटे रद्द करण्यात आली आहेत. तसेच या दोन्ही विभागांसाठी नव्याने ६ सप्टेंबर २०२१ ला ई-टेंडर मागविण्यात आली आहेत. २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत टेंडरची भरण्याची मुदत असून २२ ऑक्टोबरला टेंडर उघडण्यात येणार आहेत. नव्याने टेंडर काढल्यामुळे या टप्प्यांचे काम ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.ज्या कंपनीने काम घेतले होते त्या दोन्ही कंपन्यांची कंत्राटे रद्द करून नवे टेंडर काढण्यात आल्याने या जनहित याचिकेवर निकाल देण्याची गरज उरली नाही, अशी मल्लिनाथी न्यायालयाने केली आहे, अशी माहिती संतोष येडगे यांनी दिली.