चिपळूण – पूरग्रस्त वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करु नये, पूरग्रस्त थकित वीज ग्राहकांना विज बिल भरण्यास टप्प्या-टप्प्याने सवलत मिळावी, अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभाग प्रदेश समन्वयक सुनील सावर्डेकर यांनी महावितरण कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी लाईट बिलाबाबत देखील चर्चा करण्यात आली. तर यावर श्री. लवेकर यांनी सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती सुनील सावर्डेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
देशावर कोरोनाचे अजूनही सावट आहे. तर गेल्या दोन महिन्यांपूर्वी चिपळूणवासियांना महापुराला सामोरे जावे लागले. यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे महावितरण विभाग पूरग्रस्त वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करत आहे. ही बाब काही ग्राहकानी काँग्रेस अनुसूचित जाती-जमाती विभागाचे प्रदेश समन्वयक सुनील सावर्डेकर यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब गंभीर असल्याचे सांगत सोमवारी महावितरण विभागाचे चिपळूण कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांची भेट घेऊन हा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पूरग्रस्त वीज ग्राहकांचा तात्काळ वीज पुरवठा खंडित करू नये. त्यांना टप्प्याटप्प्याने वीज बिल भरण्यास सवलत मिळावी अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेसचे नेते इब्राहीम दलवाई, मंगेश वेस्वीकर, रवींद्र विश्वकर्मा, मानसी वरपे, प्रणिता गांधी, प्रियंका भालेकर, माधुरी हेलवंडे, मुश्ताक सय्यद, रवी चिपळूणकर, किसन चिपळूणकर, विनोद चिपळूणकर, मधुकर सावर्डेकर, रामू चिपळूणकर, चंद्रकांत पेवेकर, जितेंद्र सावर्डेकर, मंजुनाथ आचलकर आदी उपस्थित होते.