चिपळूण (प्रतिनिधी) खासदार नारायण राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बुधवारी भाजपा चिपळूण तालुक्याच्या वतीने भाजपा कार्यालय, पॉवर हाउस व चिंचनाका येथे फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून जल्लोष केला.
खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळणार हे नक्की झाले होते. बुधवारी सायंकाळी नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर चिपळूण तालुका भाजपाच्या वतीने चिपळूण भाजपा कार्यालय, पॉवर हाऊस, चिंचनाका येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी राणे साहेब आगे बढो, आवाज कोणाचा, कोकणच्या वाघाचा, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून तसेच पेढे वाटून जल्लोष केला.
यावेळी भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, नगरसेवक परिमल भोसले, जिल्हा पदाधिकारी महेश दीक्षित, भाजपा युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी प्रणय वाडकर, चिपळूण शहराध्यक्ष सुयश पेठकर, सूरज पेठकर, अभिषेक जागुष्टे शौर्य निमकर शुभम पिसे प्रफुल पिसे, श्री. रहाटे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.