चिपळूण – तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या ७ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धी विनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री ॲङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री.आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.