रामदास साळुंखे विटा
तडीपार म्हंटल की कोणीतरी गुंड, मवाली अशीच प्रतिमा आपल्यासमोर येते. पण त्याला का तडीपार केलं. त्याचा गुन्हा काय याच्या कोणी मुळाशी जात नाही. तडीपार म्हंटल की डायरेक्ट आतंकवादी असल्याचे सर्टिफिकेटचं दिले जाते. आपली लोकशाही अशी आहे की इथं प्रशासन आणि पुढारी म्हणतील तीच पूर्व दिशा असते. म्हणूनच सामान्य जनतेच्या हक्कांसाठी भांडणाऱ्या, लोकांसाठी आंदोलने करणाऱ्या, लोकांची सेवा करणाऱ्या कडेगांव तालुक्यातील एक तरुण समाजसेवकाला सांगली जिल्ह्यातून तडीपार केले गेले. उद्देश एकचं होता त्याच सामाजिक काम थांबलं पाहिजे. पण हा गडी पुरता तयारीचा निघाला. तडीपार केला खरा, पण त्याचं सामाजिक काम कोणी थांबवू शकलं नाही. प्रमोद मांडवे नाम तो सुना होगा ! हे नाव दोन गोष्टीसाठी परिचित आहे. एक समाजकार्यात आणि दुसरं आंदोलने व केसेस मध्ये. असो पण हा तडीपार गडी सांगली जिल्हयात नाही पण या कोरोना काळात जे भल्या भल्याना जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलंय. कडेगांव तालुक्यात एकसुद्धा कोव्हीड सेंटर न्हवतं. त्यावेळी तडीपार प्रमोद मांडवेनी स्वतः पुढाकार घेऊन मित्रांच्या सहकार्याने कोव्हीड सेंटर सुरू केलं. कडेगांव तालुक्यात अनेक पुढारी आहेत ज्यांच्या कडे पैसा, पॉवर, माणसे सगळं काही असतानासुद्धा कडेगांव तालुक्यात कोव्हीड सेंटर उभारणीच धाडस या लोकांनी दाखवलं नाही. पण आपल्या कडेगांव तालुक्यातील सामान्य लोकं बेड मिळत नाही म्हणून तडफडून मरत होती. त्यावेळी फाटक्या खिशाचा प्रमोद मांडवे तडीपार असताना कडेगांव तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत कोव्हीड सेंटर व्हावे म्हणून स्वतःची तडीपारी कॅन्सल करण्यासाठी लागणाऱ्या वकिलाच्या फीचे पैसे कोव्हीड सेंटरच्या मदतीसाठी वापरतो. इथेच तो थांबत नाही, तर जी-जी मदत लागणार आहे ती मदत ओळखीने गोळा करतो. जिथे कमी तिथे आम्ही ह्या उक्तीप्रमाणे कोरोनाग्रस्तांसाठी प्रमोद मांडवे भरभरून मदत करतो. आणि कडेगांव तालुक्यात पाहिले प्रायव्हेट कोव्हीड आयसोलेशन सेंटर या प्रमोद मांडवे नावाच्या तरुणाच्या सहकार्यानेच सुरू झाले. एवढंच करून थांबेल तो प्रमोद मांडवे कुठला? प्रमोद मांडवेला जिल्हा बंदी असताना, तडीपार असतानासुद्धा पोलीस-प्रशासन कायदा कशाचीच तमा न बाळगता तो कडेगांव तालुक्यात कोव्हीड सेंटरवर येऊन रुग्णांची सेवा करू लागला. मित्रांच्या साह्याने कडेगांव तालुक्यातील रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून कडेगांव तालुक्या मध्ये स्वतः हजर राहून रुग्णांची सेवा करू लागला. एवढंच काय येतंगांव ता. कडेगांव येथे एका निराधार आजीवर कोणी अंत्यसंस्कार करायला तयार न्हवते, त्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या आजीचे अंत्यसंस्कार करणारा तडीपार प्रमोद मांडवेचं होता. अशी आणखी असंख्य अनमोल कामे प्रमोद मांडवेने तडीपार असताना सुद्धा या कोरोनाच्या संकटात केली आहेत.
पण प्रशासन आणि ह्याचा छत्तीसचा आकडा. चांगल्या कामासाठी सुद्धा आडकाठी आणणारी सरकारी वर्दी यांन कोव्हीड सेंटर सुरू केल्यापासून झपाटलेल्या भुतागत प्रमोद मांडवे ला शोधतायत. आणि तालुक्यात आलास तर मग तुझी खैर नाय अशी धमकी देत होते. पण ह्याला काय लोकांची सेवा केल्याशिवाय आन गोड जात व्हयं. समाजसेवा हाच धर्म हे त्याच्या शिवशक्तीच ब्रीद वाक्यच हाय. मग या पठ्ठ्यान आणखी एक शक्कल लढवली. गावागावात कोव्हीड सेंटर उभा करा. मी तुम्हाला लागणारी मदत करतो. अशी घोषणा केली आणि शिवशक्तीच्या माध्यमातून कोव्हीड रिलीफ फंड तयार केला. यातून नवीन सुरू होणाऱ्या कोव्हीड सेंटरला लागणारे साहित्य वस्तू स्वरूपात देने जेणेकरून ते सेंटर सुरू होईल असा उद्देश होता. आणि बघता-बघता कडेगांव तालुक्यात अनेक कोव्हीड सेंटर सुरू झाली. याला तडीपार प्रमोद मांडवे नी शक्य ती मदत केली. तडसर ला बेडशीट, टॉवेल, सॅनिटायझर, विहापुरला टॉवेल, वडियेरायबाग व शिवणी येथे बेडशीट व टॉवेल तसेच गोरगरीब नागरिकांना तब्बल 3000 मास्क वाटप करण्याचं काम ह्या पठ्ठ्यानं केलं. शिवशक्तीचे कार्यकर्ते आणि प्रमोद मांडवे चे समर्थक रात्रंदिवस मदत गोळा करणे आणि जिथे आवश्यक आहे तिथे रुग्णांना देने हे काम चोखपणे करत आहेत. प्रमोद मांडवे या तडीपार युवकाने कोरोना बाधित रुग्णांसाठी सुरू केलेल्या उपक्रमामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. प्रशासन त्याला कडेगांव तालुक्यात येऊ देईना पण हा गडी मात्र कोरोनाग्रस्तांना बाहेरून मदत करतोय.
‘‘बेटा, पैसे कमवून माणूस मोठा होत नाही. कारण पैसा सोबत येणार नाही. सोबत येतील ते फक्त आशीर्वाद आणि हे आशीर्वाद समाजसेवा केल्याशिवाय मिळत नाही असे विचार असणारा हा सर्वसामान्य घरातील युवक..ज्यान कोरोना काळात स्वताला झोकून दिल कडेगाव तालुक्यात आमदार ,मंत्री आणि प्रस्थापित राजकारण्यांनी जे करून नाही दाखवलं ते ह्या फकड्याने केलं ..फक्त समाजासाठी आणि लोककल्याणासाठी. मात्र काही पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून राजकीय द्वेषापोटी प्रशासनाने प्रमोद मांडवे यांला सांगली जिल्ह्यातून तडीपार केलं.
आज तडीपार असतानासुद्धा सुद्धा हा प्रमोद मांडवे नावाचा युवक मात्र लढतोय , झटतोय कोरोनाग्रस्तांसाठी.
खरंतर ह्या पुढाऱ्यांना तडीपार करावं आणि ह्या तडीपार समाजसेवकाला आदर्श पुरस्कार देऊन तालुक्यात बोलवावं अशी सामान्य लोकांची भावना आहे. ना कोणी पुढारी ना कोणी प्रशासन सामान्य लोकांच्या मदतीला आले. शेवटी तडीपार केलेला प्रमोद मांडवे नावाचा कोव्हीड योद्धा कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावून आला.