बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील तवसाळ गावातील युवा आंबा व्यवसायिक पंकज सुभाष सुर्वे यांच्या बागेतुन ५ डझनाच्या तीन पेट्या वाशी मार्केटला आज रवाना झाल्या. पाच डझनासाठी १०,०००/- रुपयांचा दिलासादायक दर मिळाला आहे.२०२१ च्या आंबा मोसमातील गुहागर तालुक्यातुन पहिली आंबा पेटी वाशी मार्केट मार्केटला पाठवण्याचा मान तवसाळ गावाने पटकावला आहे.

गुहागर तालुक्यातील खाडी पट्ट्यातील तवसाळ हे गाव अंबा व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील प्रत्येक घरी आंबा व्यवसाय केला जातो. पंकज सुर्वे यांनी आपल्या वडिलांच्या आंबा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत नोकरीकडे लक्ष न देता व्यवसायाकडे आपला मोर्चा वळविला. ते घेत असलेली मेहनत, तज्ञांचे मार्गदर्शन व आंब्याच्या झाडांची जोपासना या जोरावरच यावर्षी त्यांच्या बागेतील झाडांना लवकर मोहर आला. मध्यंतरीच्या काळात ढगाळ वातावरण व पडलेला पाऊस यामुळे चिंतेचे वातावरण असतानाही पंकज सुर्वे यांनी आपल्या झाडांची चांगली काळजी घेतली आणि म्हणूनच गुहागर तालुक्यातुन पहिली आंबा पेटी पाठवण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. या ५ डझनाच्या पेटीला वाशी मार्केटमध्ये १०,०००/- रुपये दर मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना कालखंडात महाराष्ट्रातले आंबा व्यापारी हे थेट आंबा बागायतदारांपर्यंत पोहोचल्याने संकटाच्या काळात सुद्धा आंब्याला चांगला दर मिळाला. याचा फायदा या मोसमातसुद्धा सर्व आंबा बागायतदाराना होणार असल्याचे पंकज सुर्वे यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here