गुहागर – – गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील आर्थिक संकटात सापडलेल्या नांदगांवकर कुटुंबियांना अखेर मदतीचा हात मिळाला आहे. शृंगारतळी येथील प्रसिध्द व्यापारी व उद्योजक नासिम मालाणी यांनी त्यांना घरी बोलावून आर्थिक मदत करण्याचे वचन दिल्याने नांदगांवकर कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.
नांदगावकर कुटुंबियांचा मातीपासून गाडगी, मडकी व इतर साहित्य बनविण्याचा पारंपरिक कुंभार व्यवसाय आहे. गुहागर तालुक्यात केवळ त्यांचाच हा व्यवसाय आहे. याच कुटुंबियावर कोरोनाच्या लाँकडाऊन काळात माल विक्री न झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे ते आजतागायत. याबाबत ‘पालपेणे येथील कुंभार कुटुंबियांवर उपासमारीची वेळ’ अशा मथळ्याखाली प्रगती टाइम्सने वृत्त प्रसिध्द केले होते. शृंगारतळीतील व्यापारी, उद्योजक नासीम मालाणी यांनी या वृत्ताची दखल घेऊन नांदगावकर कुटुंबियाना माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नांदगावकर कुटुंबातील प्रमुख व अपंग असलेले उदय नांदगावकर यांना भेटण्यासाठी बोलावून त्यांना आणण्यासाठी आपले वाहनही पाठविले. त्यांनी नांदगावकर यांच्या व्यवसायाची माहिती घेऊन प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. पत्रकारांनी हा विषय समोर आणल्याने त्यांनी पत्रकारांचे आभार मानलेत. समाजात अशी कितीतरी गरीब कुटुंब आहेत त्यांना मदतीचा आधार हवा आहे, त्यांची व्यथा मीडियातून मांडावी. मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन, असे वचन उद्योजक मालाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.