गुहागर – गुहागर विधानसभा निवडणुकीची काल गुरुवारी खेड लवेल येथे मतमोजणी झाली. यावेळी एकूण झालेल्या २३ फेऱ्यांमध्ये प्रमुख दोन पक्षांमध्ये लढत पहायला मिळाली. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सहदेव बेटकर यांची बॅटींग काहीशी सरस ठरली, मात्र दुसऱ्या फेरीपासून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार भास्कर जाधव यांनी आघाडी घेत ही परंपरा शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून एकप्रकारे हॅट्रीकच केली. या सर्व फेऱ्यांमध्ये सुरूवातीपासूनच वंचित, मनसे व बसपा यांनी आपले खाते खोलले होते. तसेच नोटांनीही बऱ्यापैकी मते खाण्यास सुरूवात केली होती.
पहिल्या फेरीत सहदेव बेटकर ५० मतांनी आघाडीवर असल्याने शिवसेनेमध्ये थोडी धाकधुकी वाढली होती. मात्र दुसऱ्या फेरीत भास्कर जाधव ७४ मतांनी तर तिसऱ्या फेरीत १२८६ मतांनी आघाडीवर असल्याने शिवसैनिकांमध्ये पुढील फेऱ्यांविषयीची एकच उत्सुकता लागून राहिली. पहिल्या फेरीतील मतांची आकडेवरी पाहता खेडच्या खाडीपट्टयातील मुंबके, संगलट, शिर्शी, कोरेगाव, खारी, शेरवल, दयाळ यांसारख्या सुमारे १४ गावांनी जाधव यांना काहीसे मागे नेले होते. मात्र, दुसऱ्या फेरीत जाधव यांना लवेल विभागाने तारून त्यांना आघाडीवर आणले. लवेलमध्ये शिवसेनेचा वरचष्मा असल्याने पक्षांतर केलेल्या जाधव यांच्या पारड्यात ही मते पडल्याचे समोर आले.
पहिल्या फेरीत काहीशा मतांनी आघाडीवर असलेल्या सहदेव बेटकरांना पुढील फेऱ्यांमध्ये मागे हटावे लागल्याचे दिसुन आले. चौथ्या फेरीतही भास्कर जाधव १२ हजार ४९७ मतांनी पुढे होते. मात्र, जाधव आणि बेटकर यांच्या मतांची आकडेवारी पाहता बेटकर हे जाधव यांच्या नजीकच होते. त्यामुळे ‘काँटे की टक्कर’ अशी स्थिती यावेळी पहायला मिळाली. मात्र, पाचव्या व सहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे बेटकर खूपच मागे पडले. यावेळी भास्कर जाधव ५ हजार ७७८ मतांनी आघाडीवर होते. यावेळी बसपा ५२१, मनसे ५३२, वंचित १४०५ तर नोटा ४५० यांनीही मते मिळवली.
७ व्या फेरीअखेर भास्कर जाधव यांनी २२ हजार ९७० मते मिळवून ४ हजार ९४० मतांची आघाडी घेतली मात्र, राष्ट्रवादीचे बेटकर यांनी ८३८ मतांचा लीड यावेळी तोडलेला दिसून आला. ८ व्या फेरीअखेर जाधव ७ हजार १६२ तर ९ व्या फेरीत ८ हजार ६९३ मतांनी आघाडीवर होते ते १० व्या फेरीअखेर १० हजार ८६ मतांपर्यंत पुढेच होते. दरमजल करीत जाधव १४ व्या फेरीअखेर १५ हजार ११ मतांनी आघाडीवरच होते. यानंतर १५ व्या फेरीत जाधव यांनी मोठी मुसंडी मारल्याने राष्ट्रवादीच्या बेटकरांची विजयाची आशा जवळ जवळ मावळलीच होती. १६ व्या फेरीअखेर जाधव यांनी १८ हजार ८५८ मतांनी आघाडी घेतली होती. २१ व्या फेरीअखेर जाधव २५ हजार १७९ मतांनी आघाडीवर असल्याने त्यांच्या विजयाचा वारु चौफेर उधळू लागला होता. अखेर भास्कर जाधव २६ व्या फेरीअखेर जाधव यांना ७८ हजार ३८०, राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर यांना ५१ हजार ८८०, बसपाचे उमेश पवार २ हजार ०१, मनसेचे गणेश कदम यांना २ हजार ५१६, वंचित आघाडीचे विकास जाधव यांना ५ हजार ४९ तर २ हजार ५३ मते नोटांना पडली.