‘
गुहागर – तालुक्यातील सर्वात मोठ्या ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे गावात आरोग्य तपासणी सर्वेक्षण अंतर्गत ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच संजय पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य पथक दोन वेळा गावातील ग्रामस्थांच्या घरी दोनवेळा भेटी देऊन आरोग्य शिक्षण, आरोग्य संदेश, संशयित कोरोना रुग्ण शोधणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारखे आजार व अती जोखिम व्यक्ती ओळखून उपचारासाठी सहकार्य करणे व औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येणार आहे. तपासणी करणाऱ्या पथकासह ग्रामस्थांना मार्गदर्शन व कोरोना बाबत घ्यावयाची काळजी व त्यावर करावयाचे उपाय पटवून देण्यात येत आहेत. या उपक्रमात सरपंच संजय पवार, सर्व सदस्य, आशा सेविका व आरोग्यसेवक, ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत. दरम्यान, कोवीड प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावासाठी स्पर्धा आयोजित केली होती. जी ग्रामपंचायत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी यशस्वी होईल, त्या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात येईल, असे जाहीर केले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये पाटपन्हाळे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे गावात अधिक उत्साह असून माझ कुटुंब माझी जबाबदारी या अभियानातही ग्रामपंचायतीसह सर्वांनीच झोकून दिल्याचे पहायला मिळत आहे.















