चिपळूण – कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक फिजिशियन, टेक्निशियन तसेच वैदयकीय यंत्रणा नसताना चिपळूण येथील लाईफकेअर या प्रसिध्द हाॅस्पीटलने शासनाकडून कोविड सेंटरची परवानगी मिळवली आणि अशा कोविड सेंटरमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब आज आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये समोर आली. लाईफ-केअर कोविड सेंटरमध्ये रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर येताच आमदार जाधव हे प्रचंड संतप्त झाले.
चिपळूण येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमात शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे यांनी खासगी दवाखान्यांमध्ये कोरोना रूग्णांकडून अवास्तव बिले घेतली जात असल्याचे आणि त्याविरूध्द आंदोलन करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आमदार जाधव यांनी सध्या रूग्णांना हाॅस्पीटल उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आंदोलन करून हाॅस्पीटल बंद पाडली तर रूग्णांचे फार मोठे हाल होतील. त्यामुळे यावर बैठक घेवून चर्चा करून मार्ग काढू, असा शब्द दिला होता. याचवेळी लवकरच ही बैठक आयोजित करा, अशी सूचना त्यांनी प्रांताधिकारी पवार यांना केली होती.
बैठकीच्या सुरूवातीलाच आमदार भास्कर जाधव यांनी डाॅक्टरांना त्यांच्या अडचणी मांडण्यास सांगितल्या. श्री हाॅस्पीटलचे डाॅ. अभिजित सावंत, पुजारी हाॅस्पीटलचे डाॅ. विशाल पुजारी यांनी रूग्णांना आॅक्सिजनचा करावा लागणारा पुरवठा, त्यासाठी येणारा खर्च, आॅक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उभारण्यात आलेली खर्चिक यंत्रणा, कर्मचाऱ्यांची कमतरता असे अनेक प्रश्न मांडले. या बैठकीला लाईफकेअर हाॅस्पीटलचे डाॅ. शाहीद परदेशी उपस्थित होते. आमदार श्री. जाधव हे अन्य डाॅक्टरांकडून त्यांच्या दवाखान्यांमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांपैकी काही रूग्णांची नावे घेवून त्यांच्या मृत्यूची कारणे जाणून घेत होते. त्याप्रमाणे लाईफकेअरचे डाॅ. परदेशी यांनाही त्यांनी त्यांच्या हाॅस्पीटलला दाखल झालेले आणि प्रकृती उत्तम असतानाही गुहागर शहरातील रवी बागकर यांचा अचानक मृत्यू कसा झाला, असा प्रश्न विचारला. पण, डाॅ. परदेशी यांना काहीच उत्तर देता आले नाही. त्यानंतर त्यांनी हाॅस्पीटमध्ये फिजिशियन कोण आहेत, असा प्रश्न करताच डाॅ. परदेशी यांनी डाॅ. समीर दळवी यांचे नाव घेतले. परंतु, डाॅ. दळवी हे फिजिशियन आहेत? असा पुन्हा प्रश्न विचारला, त्यावर डाॅ. परदेशी निरूत्तर झाले. फिजिशियन नसताना कोरोना रूग्णांवर उपचार कोण करतं, कसे उपचार केले जातात असे अनेक प्रश्न त्यांनी डाॅ. परदेशी यांना विचारले पण, एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते.
कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक फिजिशियन, टेक्निशियन तसेच वैदयकीय यंत्रणा नसताना लाईफ केअर हाॅस्पीटलने कोविड सेंटरला परवानगी मिळवली आणि या सेंटरमध्ये रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने बैठकीत एकच खळबळ उडाली. आमदार भास्कर जाधव हे देखील प्रचंड संतप्त झाले. कोणतेही निकष न तपासता या कोविड सेंटरला परवानी देण्यात आली काय, आणि ते सुरू झाल्यानंतर तुम्ही स्थानिक अधिकाऱ्यांनीही तपासणी का केली नाही, असे संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. हे हाॅस्पीटल रूग्णांच्या जीवाशी खेळत आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे, ती गांभीर्याने घ्या, अन्यथा आपण कोणाचीही गय करणार नाही, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला. बैठकीला हाॅस्पीटलच्या प्रमुख डाॅक्टरांऐवजी व्यवस्थापन पाहणाऱ्या व्यक्तीला पाठविण्यात आल्याने त्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव विधाते, कामथे उपजिल्हा रूग्णालयाचे डाॅ. अजय सानप, नायब तहसीलदार शेजाळ आदी उपस्थित होते.