बातम्या शेअर करा

माणगाव -(अजय होळकर)- संपुर्ण कोकणामध्ये एकमेव असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हे विद्यमान कुलगुरूंच्या निष्क्रीयतेमुळे बंद होण्याच्या मार्गावर असून कुलगुरूंच्या हुकूमशाहीला विद्यापीठातील सर्व कर्मचारी,परिसरातील प्रकल्पग्रस्त,बेरोजगार व छोटे ठेकेदार संतप्त झाले आहेत.

गेली सहा महिने कुलगुरू कार्यालयात येत नाहीत करोनाचे कारण देत कायम बंदिस्त घरीच असतात. ते त्यांच्या आसपास कोणालाही येऊ देत नाही. विद्यार्थांच्या हिताचे निर्णय वेशीवर टांगत कोरोनाचा बागुलबुवा कुलगुरू किती दिवस करणार आहेत?? असा संतप्त सवाल विद्यापीठ प्रशासनालाच पडला आहे. एकीकडे कुलगुरू हजेरी लावत नाहीत तर दुसरीकडे विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलसचिव नाहीत. एका वर्षात पाच वेळा कुलसचिव बदलले आहेत. ते देखील कायमस्वरूपी नसल्याने पुणे मुंबईत राहून कारभार संभाळतात. विद्यापीठात कुलसचिव, ज्युनियर इंजिनियर, शाखा अभियंता, वित्त अधिकारी, परिक्षा नियंन्त्रक अश्या अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या गेली १५ वर्षे रिक्त आहेत. स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने विद्यापीठासाठी घेतल्या खर्या परंतु त्या जागेचा वापर योग्य रितीने विद्यापीठ प्रशासनाकडून होताना दिसत नाही. स्थानिकांना परमनंट नोकरी मिळावी यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी यांना दर तीन महिन्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले जाते व रोजंदारी कर्मचारी यांना विद्यापीठाच्या कामासाठी कमी व वैयक्तिक कामासाठी जास्त राबवल्याची तक्रार याआगोदर देखील नेहमीच राहिली आहे.
वित्त अधिकारी हे छोटे छोटे सुशिक्षित अभियंते व इतर काम करणारे लोक यांना काम न देतां ॲानलाईन जेईम या साईटवरून विद्यापीठाला लागणार्या गोष्टी खरेदी करत असल्याने परिसरातील छोट्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यापीठ हे विद्यार्थांना प्रचंड त्रास देत असून कुलगुरूंचा वित्त अधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांवर कोणताच वचक राहिलेला दिसून येत नाही.या आगोदर कुलगुरू पदी देशपांडे, कुलकर्णी, मानकर यांनी त्यांच्या काळात शिक्षणाचा दर्जा चांगल्या प्रकारे उंचावला होता त्यामुळे देशातून लोणेरे येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत होते. विद्यापीठ ॲडमिशनसाठी विद्यार्थांमध्ये मेरीट साठी मोठी चढाओढ होताना दिसत होती.लोणेरे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून भविष्यात ओळखले जाईल असे चित्र तयार झाले होते. त्यावेळचे विद्यमान मुख्यमंन्त्री बॅरिस्टर अंतुले यांनी करोडोंचा निधी उपलब्ध करून विद्यापीठ प्रशस्त, देखणे होईल याची काळजी घेत जातीने लक्ष दिले होते. विद्यापीठामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळायचे परंतु गेली काही वर्ष ऍडमिशनचा कोटा देखील पूर्ण होताना दिसत नाही याला जबाबदार प्रशासन आहे. स्थानिक लोकांनी या विद्यापीठाला जवळ जवळ ५०० एकर जमीन कवडीमोल दराने दिली आहे. परंतु त्यापैकी निम्मी जमीन सुद्धा अजून पर्यंत विकसित झालेली नाही.त्यामुळे विकसित न झालेली जमीन आम्हाला परत मिळावी म्हणून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मागणीला आता जोर वाढत आहे.स्थानिक सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना कामे दिली जात नाहीत आणि दिली तर त्यामध्ये हेतुपुरस्तर अडचणी निर्माण केल्या जातात. बाहेरील ठेकेदाराला सलगी कामे दिली जातात, बाहेरील ठेकेदाराकडून सहजरित्या पैसे उकळता येतात हाच त्याच्यामागचा प्रमुख हेतू असतो. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने बिल्डींगच्या मेंटेनन्सची कामे देखील योग्य वेळी केली नसल्याने ईमारत जिर्ण अवस्थेत झाल्या आहेत तर अर्ध्याहून जास्त ईमारतीचा उपयोग होत नसल्याने ईमारत पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळेच विद्यापीठाला शास्त्रीची नव्हे तर चांगल्या मेस्त्रीची गरज असल्याचा घणाघात स्थानिक नेते, शिवसेना मा. जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. याबरोबरच करोनाच्या महामारीत विद्यापीठ प्रशासनाने टेंम्पररी असलेल्या कर्मचारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने सुशिक्षित बेरोजगरांवर उपासमारीची वेळ आली होती त्याकडे देखील विद्यापीठ प्रशासनाने पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले होते.
विद्यापीठाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये जर विद्यापीठ प्रशासनाने सुधारणा केली नाही तर स्थानिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंन्त्री उद्धवजी ठाकरे, मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना उदयजी सामंत उद्योगमंत्री ना. सुभाषजी देसाई साहेब यांना भेटणार असून कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवून विद्यापीठावर प्रशासक नेमावा अशी मागणी करणार असल्याचे प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले. यासंबधी विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यमान कुलगुरू शास्त्री यांच्याकडून प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता राॅंग नंबर है अशी प्रतिक्रिया देऊन कुलगुरूंनी प्रतिक्रीया देणे टाळले आहे.

विद्यापीठ झाल्यानंतरच स्थानिकांना रोजगार मिळेल, छोटे मोठे उद्योगधंदे चालू होतील, तरुणांनाच नोकर्या मिळतील या आशेने आम्ही आमच्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या परंतु आजतागायत विद्यापीठाने सर्वच बाबतीत स्थानिकांची कुचंबना केल्याने स्थानिकांचा संतापाला भविष्यात विद्यापीठ प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे- प्रकल्पग्रस्त प्रमोद घोसाळकर


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here