खेड – खेड नगरपरिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी खेड येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“हा विजय माझा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. राज्यमंत्री योगेश कदम, आमचे उपनेते संजय कदम, सदानंद चव्हाण, राजन साळवी, किरण भैया सामंत आणि संपूर्ण टीमने एकत्रितपणे काम केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात ९९ टक्के स्ट्राईक रेट राखता आला. शिवसेना-भाजपला खेडवासीयांनी भरभरून दिलेले मत हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.”
चिपळूण ; नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिले दिग्गजांना नारळ
खेड नगरपरिषदेबाबत आश्वासन देताना ते म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा इथे आलो आहे. खेड नगरपरिषदेला नियोजन मंडळातून एकही रुपया कमी पडू देणार नाही, हे मी खेडवासीयांना आश्वस्त करतो.” महायुतीची सत्ता आल्याने विरोधकांचा पूर्णपणे पराभव झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली २९ पैकी २९ महानगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आमदार शेखर निकम यांच्या ‘स्वबळा’च्या नार्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, ही राष्ट्रवादीची भूमिका असू शकते, मात्र शिवसेना आणि भाजप या जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत.















