चिपळूण – चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत आज लागलेल्या निकालांमध्ये अनेक धक्कादायक निकाल पहावयास मिळाले. त्यामध्ये पुन्हा-पुन्हा निवडणूक लढणाऱ्या माजी नगरसेवकांना जनतेने चोख नाकारले. या निकालाने संबंधितांना जोरदार धक्का बसला आहे.
आज चिपळूण पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना-भाजपा युतीचे तरुण उमेदवार उमेश सकपाळ हे तब्बल 1500 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीत असेही काही निकाल लागले जे लक्षवेधी ठरले आहेत.
यामध्ये प्रभाग बारा मधून शिवसेना उबाठा कडून मोहन मिरगल हे पाचव्यांदा निवडणूकला सामोरे जात होते. परंतु त्यांना अवघ्या एका मताने पराभव स्वीकारावा लागला. प्रभाग आठ मधून राजेश केळसकर हे तिसऱ्यांदा निवडणूक ला सामोरे गेले. पण तिथे त्यांना अजित पवार गटाचे तरुण उमेदवार योगेश पवार यांनी धूळ चारली. प्रभाग क्रमांक चार मधून भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक आशिष खातू हे दुसऱ्यांदा निवडणूकला सामोरे गेले. पण शिवसेना उबाठाचे उमेदवार अजय भालेकर यांनी त्यांचा पराभव केला. तसेच प्रभाग दोन मधून कबीर काद्री यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवली. ते तिसऱ्यांदा निवडणूकला सामोरे गेले खरे पण इथे त्यांचा काँग्रेसचे तरुण उमेदवार साजिद सरगुरोह यांनी पराभव केला. समीर जानवळकर, किशोर रेडीज, परिमल भोसले, रुही खेडेकर,रुकसार अल्वी,कबीर काद्री,नुपूर बाचिम, सुधीर शिंदे ,वैशाली शिंदे,शैलेश. टाकळे,सचिन कदम,सुनील कुलकर्णी,सानिका टाकळे,राजेश देवळेकर,निशिकांत भोजने,नित्यानंद भागवत,लियाकत शाह,नयन भोजने,स्वाती दांडेकर या सगळ्यांना चिपळूणकरांनी नाकारलेले आहे. तर फक्त माजी नगरसेवकांपैकी भाजपचे शशिकांत मोदी, काँग्रेसच्या सौ. सफा गोठे आणि भाजपच्या सौ. रसिका देवळेकर हे पुन्हा एकदा ‘नगरसेवक’ झाले आहेत. चिपळूण शहरातील जनतेने यावेळी नव्या चेहऱ्याना संधी दिली असून प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.















