चिपळूण – चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी विजयाचा खणखणीत ‘चौकार’ लगावत पक्षांतर्गत विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले. काही महिन्यांपूर्वी भाजपमधील एका गटाच्या दबावामुळे त्यांना मंत्री नितेश राणे यांच्यासमोर दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. मात्र त्या अपमानावर कोणतीही प्रतिक्रिया न देता, मोदींनी त्याचा जाब थेट निवडणूक निकालातून दिला—आणि चौथ्यांदा दिमाखात नगरसेवक म्हणून चिपळूण पालिकेत प्रवेश निश्चित केला.
चिपळूण ; नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी दिले दिग्गजांना नारळ
प्रभाग क्रमांक ९ मधून तब्बल ८०० हून अधिक मतांनी शशिकांत मोदी यांनी दणदणीत विजय मिळवला. चिपळूण पालिकेतील सर्वात अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाणार आहे. यापूर्वी तीन वेळा शिवसेनेकडून नगरसेवक राहिलेल्या मोदींनी, शिवसेनेतील फूटीनंतर काही काळ उद्धव ठाकरे गटासोबत राहणे पसंत केले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लगेचच त्यांना चिपळूण शहर प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली—हीच गोष्ट पक्षातील काही घटकांना खटकली. त्यातूनच विरोधकांनी येनकेन प्रकारे मोदींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मंत्री नितेश राणे चिपळूण दौऱ्यावर असताना, या गटाने मोदींविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. शिवसेनेतील जुन्या राजकीय संघर्षांचे दाखले देत वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करून मोदींनी वादाला पूर्णविराम दिला. मात्र निवडणुकीतही हा संघर्ष थांबला नाही. थेट मोदींच्या विरोधात उमेदवारी दाखल करून त्यांचा पराभव करण्याचा चंग बांधण्यात आला. तरीही ज्या निवडणुकीत अनेक माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला, त्याच लढतीत शशिकांत मोदी यांनी चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विरोधकांची बोलती बंद केली. राजकीय संयम, संघटन कौशल्य आणि मतदारांशी असलेली थेट नाळ—याच बळावर मोदींनी दिलगिरीच्या क्षणाला विजयाच्या ‘चौकारात’ रूपांतरित केल्याची चर्चा आता संपूर्ण शहरात रंगू लागली आहे.















