गुहागर – प्रजासत्ताक दिनी नुकताच गुहागर तहसीलच्या वतीने विशेष उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी /संस्था यांचा गौरव करण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी घनश्याम जांगीड यांना देखील उत्कृष्ठ सेवेबद्दल विशेष सन्मान करून गौरविण्यात आले.
गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भागात कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली येथे सन २००५ ते २०२३ पर्यंत उत्कृष्ठ रुग्ण सेवा त्यांनी दिली आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करून सन २०१७-१८ पासून सलग पाच वेळेस प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली या संस्थेला कायाकल्प पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रमाणपत्र, स्मरणचिन्ह तसेच पन्नास हजार रोख रक्कम असे कायाकल्प पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली येथे कार्यरत असताना तालुका आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार यशस्वीपणे सांभाळत तसेच कोविड साथीच्या काळात संपूर्ण तालुक्याचे उत्कृष्ठ नियोजन करून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. तसेच कोविड लसीकरणात उत्तम शिस्त लाऊन जिल्ह्यात एक आदर्श देखील त्यांनी निर्माण केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदार संघात नोडल अधिकारी म्हणून उत्तम आरोग्य सुविधा तसेच गुहागर, चिपळूण व गुहागर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेशी उत्तम समन्वय साधून व्यवस्थापन जांगीड यांनी केले. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीसाठी नुकताच प्रजासत्ताक दिनी तहसिलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते स्मरणचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन डॉ घनश्याम फुलचंद जांगीड यांचा सन्मान करण्यात आला.