मँचेस्टर – तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी विंडीजचा पहिला डाव 197 धावांत गुंडाळून यजमान इंग्लंडने पहिल्या डावात 172 धावांची आघाडी मिळविली. स्टुअर्ट ब्रॉडने टिपलेल्या सहा बळींमुळे विंडीज ची ही अवस्था झाली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने दुसऱया डावात बिनबाद 86 धावा जमविल्या होत्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडने 33 षटकांत बिनबाद 110 धावा जमवित आघाडी 282 धावांपर्यंत वाढविली होती. सिबलीने अर्धशतक (56) पूर्ण केले होते तर बर्न्स 46 धावांवर खेळत होता.
इंग्लंडने पहिल्या डावात 369 धावा जमविल्यानंतर दुसऱया दिवशीअखेर विंडीजने 6 बाद 137 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांनी तिसऱया दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि उर्वरित चार गडय़ांनी त्यात आणखी 60 धावांची भर घालत फॉलोऑन टाळण्यात कसेबसे यश मिळविले. ब्रॉडने भेदक मारा करीत चारही फलंदाजांना बाद करीत एकूण 31 धावांत 6 बळी मिळविले तर अँडरसनने 2 बळी टिपले.
विशेष म्हणजे ब्रॉडला पहिल्या कसोटीत वगळण्यात आले होते, त्यावेळी त्याने नाराजीही व्यक्त केली होती. विंडीजने तो सामना जिंकून आघाडी घेतली होती. दुसऱया कसोटीत संधी मिळाल्यावर त्याने दोन्ही डावात प्रत्येकी 3 बळी टिपले तर या कसोटीत त्याने फलंदाजीत 45 चेंडूत 62 धावा फटकावल्या आणि आता 6 बळी मिळविले. पाच किंवा त्याहून जास्त बळी मिळविण्याची त्याची ही 18 वी वेळ आहे. कसोटीत त्याने 497 बळी टिपले असून या सामन्यात पाचशेचा टप्पा गाठण्याची त्याला संधी आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 369, विंडीज प.डाव 65 षटकांत सर्व बाद 197 : कॅम्पबेल 32, होप 17, ब्लॅकवुड 26, होल्डर 46, डॉरिच 37, कॉर्नवाल 10, अवांतर 15. गोलंदाजी : अँडरसन 2-28, ब्रॉड 6-31, आर्चर 1-72, वोक्स 1-57. इंग्लंड दु.डाव (33 षटकाअखेर) बिनबाद 110 : बर्न्स खेळत आहे 5 चौकारांसह 46, सिबली खेळत आहे 7 चौकारांसह 56.