दापोली – दारू व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्ती कधी कोणत्या थराला जातील, याचा नेम नसतो. असाच एक धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यात घडला. दररोज दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये वादावादी आणि धक्काबुक्की होत असे. यापूर्वीही दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. मात्र शनिवारी झालेल्या वादात मित्रानेच मित्राचा खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशाल शशिकांत मयेकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी असलेला शशिभूषण शांताराम सणकुळकर घटना स्थळावरून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विशाल हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडल्याचे येथून जात असलेल्या बहिणीने पाहिले. तिने आपल्या दुसऱ्या भावाला फोन केला. तत्काळ भाऊ घटनास्थळी दाखल झाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अमित शशिकांत मयेकर याने या खून प्रकरणाची फिर्याद दाभोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. उच्चशिक्षित असलेला विशाल हा एकेकाळी एरॉन आणि भारतीय शिपाईडमध्ये कामाला होता, पण नंतर येथून नोकरी सुटल्यावर तो किरकोळ कामधंदा करीत असे. यातूनच त्याला व्यसनही लागले होते. दाभोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल शशिकांत मयेकर त्याचा मित्र शशिभूषण शांताराम सणकुळकर आणि मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासह मोलमजुरी करायला नेहमी जात असे. दारू पित असत. या नशेत होणाऱ्या वादातून अनेकदा दोघांमध्ये धक्काबुक्की होत असे. दिनांक 18 मे रोजी अशाच प्रकारचा वाद आणि धक्काबुक्की झाली. त्यातच शशिभूषण याने वादातच कोणत्या तरी जड वस्तूने किंवा हत्याराने मयत विशाल मयेकर याच्यावर वार केला. त्यातच पंचनदी निर्बुडेवाडी येथे राहाणाऱ्या विशालचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि ए. एम. गोरे करीत आहेत. या सगळ्या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोळ पोलिसांनी तपास पथके नियुक्त केले आहेत. लवकरच खून करणाऱ्या संशयित आरोपी पकडण्यात यश येईल, अशी माहिती दिली आहे.