चिपळूण- चिपळूण तालुक्यातून सुमारे तीन हजार मराठ्यांची नोंदणी झाली असून मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात हे सर्व मराठे जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रकाश देशमुख यांनी दिली.
मराठा क्रांती मोर्चा चिपळूणची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. याचवेळी शिवजयंतीचा उत्सवही उत्साहात आणि प्रमाण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याबाबतही नियोजन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांचे दिनांक २० जानेवारीपासून मुंबई येथील राज्यव्यापी आंदोलन सुरू होत असून साधारण दिनांक २६ जानेवारी रोजी ते नवी मुंबईत पायी चालत येतील व लाखोच्या संख्येने मराठे त्यांच्यासोबत असतील. मनोज जरांगे पाटील यांच्या गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी जे आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी कोकणातील विशेष करून चिपळूण तालुक्यातील जवळपास तीन हजार मराठ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती राज्य समन्वयक प्रकाश देशमुख यांनी दिली. दिनांक २६ तारखेपर्यंत येथील मराठे मुंबईत जातील असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या बैठकीला प्रकाश देशमुख यांचेसह सतीश मोरे, दिलीप देसाई, सतीश कदम, परिमल भोसले, सुबोध सावंतदेसाई, संतोष सावंत देसाई, मकरंद जाधव, दीपक शिंदे, कपील शिर्के, प्रभाकर मोरे, तानाजी इलके, प्रसाद शिर्के, बाबू सुर्वे, निर्मला जाधव, रश्मी मोरे, स्वरा शिंदे, वीणा, पूर्वा तांदळे, फाळके, सुकन्या चव्हाण, भाग्यश्री चोरगे आदी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या अगोदरच चिपळूण तालुक्यातून एक भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर गेल्याच महिन्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या लाक्षणिक उपोषणासाठी तालुक्यातील हजारो मराठा बांधव आले होते. याच उपोषणाला आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, उद्योजक तसेच काँग्रेसचे नेते प्रशांत यादव, याशिवाय अनेक मराठा समाजातील लोकप्रतिनिधी हजेरी लावली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर नोंदणी सुरुवात झाली आहे व त्यानुसार गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. याच बैठकीला शिवजयंती साजरा करण्याबाबतही चर्चा झाली व हा उत्सव मोठ्या प्रमाणावर नेहमीप्रमाणे करण्यात येईल, असे ठरवण्यात आले.