गुहागर – गुहागर शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर खुलेआम गांजा विक्री करणाऱ्या एकावर गुहागर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून तब्बल १ किलो ४०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना याबाबत माहिती प्राप्त झाली होती. अतिशय सावधानता बाळगून मध्यरात्री १ वाजता आरे नदीवरील पुलाजवळील शैलेज भोसले याच्या घरावर आपल्या पोलिस सहकाऱ्यांसमवेत धाड टाकली. यामध्ये १ किलो ४०० ग्रॅम गांजा मिळून आला. या गांजाची अंदाजीत किंमत ४५ हजार ठरविण्यात आली आह. याप्रकरणी शैलेज भोसले याच्यावर एनडीपीएस कलम ८, 20 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्षे गांजा व्यवसाय सुरु असल्याचे आजुबाजूला छुप्या पध्दतीने चर्चा सुरु होती. अनेकजण येथून गांजा घेऊन जात होते तर काहीजण तेथे गांजा ओढत असल्याचे बोलले जात होते मात्र, आतापर्यंत कोणतेही कार्यवाही झाली नव्हती. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी सदर अवैध व्यवसायावर कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.