गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी वादळाने जमीनदोस्त झालेल्या टेहळणी मनोऱ्याची लिलाव प्रक्रिया न करताच त्याची परस्पर विक्री करुन त्याचे नाममात्र, रक्कम बऱ्याच महिन्यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी भरणा केल्याची तक्रार वेळणेश्वरचे ग्रामस्थ सुरेंद्र हरिश्चंद्र घाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी व गटविकास अधिकारी गुहागर यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील वेळणेश्वर-वाडदई ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराविरोधात सुरेंद्र घाग यांनी टेहळणी मनोऱ्याच्या परस्पर विक्रीविषयी माहिती अधिकारात माहिती मागविली. त्यातून याबाबत बऱ्याच गोष्टी त्यांनी उजेडात आणल्या आहेत. कोकण विकास पर्यटनामार्फत वेळणेश्वर समुद्रकिनारी बसविलेला टेहळणी मनोरा ४ जून २०२० रोजीच्या वादळामध्ये जमीनदोस्त झाला होता. त्या टेहळणी मनोऱ्याचे वजन १५९१ किलो होते. सदर टेहळणी मनोऱ्याची विल्हेवाट लावणे व लिलाव करण्याचे दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते ठरले होते.
सदर बाबतीत दि. १६ मार्च २०२१ रोजी गटविकास अधिकारी व तहसिलदार गुहागर यांना कळविले होते. परंतु त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार केला गेला नाही. टेहळणी मनोरा विक्रीबाबत शासनाच्या नियमाप्रमाणे लिलाव प्रक्रिया पार पाडली गेली नाही. माहिती अधिकारात असे आढळून आले आहे की, टेहळणी मनोरा मागील दीड वर्षापूर्वी शासनाची कोणतीही परवानगी न घेता विक्री केला गेला आहे व त्यावेळी त्याचे वजन अंदाजे ४०० किलो दाखविले गेले. विक्री करुन आलेली रक्कम दि. २१ आँगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायतीमध्ये जमा केली गेली नव्हती. ग्रामपंचायतीच्या नियमानुसार, ग्रा.पं. मालकीची कोणतीही वस्तू विकली असता विक्री रक्कम ग्रा.पं.मध्ये ७ दिवसाच्या आत भरणे आवश्यक असते. मात्र, ही रक्कम सरपंच यांनी उशिरा भरल्याने हा एकप्रकारचा गैरव्यवहार असून याची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सुरेंद्र घाग यांनी केली आहे.