चिपळूण – येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेबुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सास्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील विविध लोककला सादर होणार आहेत. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत तारपा, घोळनृत्य, दशावतार, चित्रकृती यांसह विविध कला एकत्र आणल्या जाणार आहेत. रोजची संध्याकाळ विविध लोककलांच्या दर्शनाने सुरू होणार आहे. खाद्य महोत्सवांतर्गत विविध कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टॉल असतील. श्री जुना कालभैरव मंदिर अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानावर उभारण्यात आलेल्या सह्याद्रीनगरात हा महोत्सव होणार आहे.
कोकणची सांस्कृतिक राजधानी असा लौकिक असणारी चिपळूण नगरी वेगवेगळ्या सांस्कृतिक, आध्यात्मिक उपक्रमांनी आणि कला, क्रीडा, संगीत, नाट्य अशा चळवळीने गजबजलेली असते. चोखंदळ आणि व्यासंगी चिपळूणकर रसिक या सर्व उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत असतो. असाच आणखी एक महोत्सव येत्या ५ ते ८ फेब्रुवारी या काळात चिपळूणमध्ये रंगणार आहे. कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. गोवा आणि केरळकडे असणारा पर्यटकांचा ओघ तितक्याच निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक संपन्नता असणारा आणि परंपरा जपणाऱ्या कोकणाकडे वळण्याची गरज आहे. कोकणचे निसर्गसौंदर्य, खाद्यपदार्थ, सामाजिक,सांस्कृतिक परंपरा आणि मुख्यत: कोकणची लोककला ठळकपणाने जगासमोर यावी, अपरिचित कोकणची ओळख व्हावी आणि पर्यटकांचे पाय कोकणाकडे वळावेत, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा ४० पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे ३० पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवैय्यांसाठी पर्वणी असणार आहे. हा सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.
रविवारी, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी आमदार शेखर निकम, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, राजन साळवी, योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रशांत यादव, डॉ. यतीन, लोककलावंत प्रभाकर मोरे, ओंकार भोजने उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता लोककला शोभायात्रा निघेल. ११ वाजता उद्घाटन समारंभ हील. सायंकाळी ६ वाजता लोककला सादरीकरण होईल. त्यामध्ये देवाला गाऱ्हाणे (योगेश बांडागळे, देवरूख, ता. संगमेश्वर), गोंधळी (शंकर यादव आणि सहकारी, ओमळी, ता.चिपळूण), संकासूर, – गोमू (श्री भैरी व्याघ्रांबरी नमन मंडळ, असगोली, ता. गुहागर), लोकवाद्ये मैफल (डीबीजे महाविद्यालय, ता. चिपळूण), गजा नृत्य (नवजीवन मित्र मंडळ, कळसुली, कणकवली, जि. सिंधुदुर्ग), उखाणे (नेहा सोमण आणि सहकारी (चिपळूण), सापाड (श्री गणेश मित्र मंडळ, माचीवलेवाडी, तरवळ, ता. रत्नागिरी), नमन (सुंकाईदेवी प्रासादिक नमन मंडळ, सड्ये, ता. रत्नागिरी) या कला सादर होतील.
सोमवारी (दि. ६) सकाळी १० वाजता कोकणातील खाद्य संस्कृती (सहभाग – राजीव लिमये, सौ. मुग्धा लिमये, सौ. सुजाता साळवी-चिटणीस) आणि पावणेबारा वाजता जाखडी : काल, आज आणि उद्या (सहभाग – डॉ. सूर्यकांत चव्हाण, मधुकर पंदेरे, शंकर भारदे, विजय कुवळेकर, अनिल गावडे) हे दोन परिसंवाद होतील. सायंकाळी ६ वाजता गाऱ्हाणे (सुनील बेंडखळे, रत्नागिरी), चित्रकथी (शंकर मस्के (सिंधुदुर्ग), कुंभार (दौलत पालकर आणि सहकारी, खामशेत, गुहागर), भेदिक शाहिरी (मधुकर पंदेरे व सहकारी, लांजा), जाखडी (नवलाई देवी नाच मंडळ-लांजा), तारफा (तलासरी-बोर्डी तारफा-पालघर), घोरनृत्य (मरवडा घोर नृत्य- पालघर) आणि दशावतार (तेंडोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ-सिंधुदुर्ग) या कला सादर होतील.
मंगळवारी (दि. ७ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता रत्नभूमीतील लोककला (सहभाग – माधव भांडारी, बाबू घाडीगावकर, रमेश सावंत, दुर्गेश आखाडे, अमित ओक) आणि पावणेबारा वाजता लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती (सहभाग – डॉ. सूर्यकांत आजगांवकर, डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. निधी पटवर्धन, रूपाली अणेराव, अमोल पालये) हे दोन परिसंवाद होतील. सायंकाळी ६ वाजता देवाला गाऱ्हाणे (सचिन काळे, ता. रत्नागिरी), काटखेळ (श्री चंडिकादेवी मंदिर, खेर्डी, ता. दापोली), गौरी टिपरी व गोफ नृत्य (राधाकृष्ण महिला मंडळ, फणसवळे, ता. रत्नागिरी), म्हणी आणि शिव्या (सुनील बेंडखळे, सचिन काळे, ता. रत्नागिरी), पोवाडा (प्रदीप मोहिते आणि सहकारी, ओमळी, ता. चिपळूण), नकटा (निवबाळ विकास मंडळ, येसरेवाडी, ता. दापोली), कोळी नृत्य (दुर्वास पायकोळी, नामदेव खामकर आणि सहकारी, श्रीवर्धन, जि. रायगड), डेरा (कासारवाडी डेरा खेळ, ता. दापोली), होळी– पालखी नृत्य (देवी पद्मावती पालखी नृत्य मंडळ, मार्गताम्हणे, ता. चिपळूण) या कला सादर होतील.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बुधवार( दि. ८ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता नमनाचा अनुबंध (सहभाग – मुकुंद कुळ्ये, युयुत्सु आर्ते, वैभव सरदेसाई, सुनील बेंडखळे, विलास बुदर) आणि पावणेबारा वाजता शाश्वत पर्यटन (सहभाग – आशुतोष बापट, वैभव सरदेसाई, प्रसाद गावडे, सचिन कारेकर, मकरंद केसरकर) हे दोन परिसंवाद होतील. सायंकाळी ६ वाजता गाऱ्हाणे ) अक्षता कांबळी, सिंधुदुर्ग), मंगळागौर (चिपळूण महिला मंडळ), कातकरी (गणेशपूर आदिवासी मंडळ, नांदिवसे, चिपळूण), मुस्लिम गीते आणि खालू बाजा (मैनुद्दीन चौगुले व सहकारी, चिपळूण), जलसा (मुक्ती संग्राम, आंबेडकरी जलसा, कोकरे, चिपळूण), वैदिक लग्नगीते (सुवर्णा पाथरे, रत्नागिरी), घोरीप (रवळनाथ नमन मंडळ रत्नागिरी) आणि महिला दशावतार (सिंधुदुर्ग) या लोककला सादर होतील.
महोत्सवात लोककला मुखवटे प्रदर्शन (प्राचीन कोकण, गणपतीपुळे, रत्नागिरी) भरविण्यात येणार आहे.
सत्कार आणि समारोप समारंभ बुधवारी, सायंकाळी साडेचार वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होईल. या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनेलवर होणार आहे. महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले आहे.