दापोली- करोनाचा संसर्ग झालेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी रेमडेसिवार, टॉसिलिझुमव ही इंजक्शन्स तसेच फेविपिरावीर या गोळ्या राज्य शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अल्पदरात तसेच दारिद्र्य रेषेखालील रुग्णांस मोफत उपलब्ध करून दया व्यात अशी मागणी वजा विनंती करणारे पत्र खेड नगर परिषदेचे शिवसनेचे गटनेते बाळा खेडेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. करोना रुग्णांवर मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमधून प्रभावी ठरलेले औषध म्हणून सध्या रैमडेसिवार’, ‘टॉसिलिझुवम’ ही इंजक्शन्स तसेच फेविपिरावीर या गोळया रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहेत. मात्र या औषधांसाठी र, १२,५००/- ते ४०,०००/- इतका खर्च येत आहे. ‘फेविपिरावीर’ ही गोळी महागडी आहे. अनेक रुग्णांवर, ४०,०००/- रक्कमेची दोन इंजक्शन्स देण्याचीही गरज भासत आहे. ही सगळी माहिती त्यांनी पत्रात मुख्यत्र्यांना दिली आहे.
आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातही ही औषधे उपलब्ध झाली आहेतच. मात्र त्यांची उणीव भासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच रत्नागिरी जिल्हा म्हणजे कोकणाचे प्रवेशद्वार ! येथील बहुतांश नागरीक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच रोजंदारीवर काम करणारे आहेत. यावर्षी या आजाराच्या प्रादर्भावामुळे सर्वच कामे रखडल्याने आता रत्नागिरी जिल्ह्यातील नागरीक आर्थिकदृष्ट्या हताश झालेले आहेत. या नागरिकांना या औषधाचा खर्च परवडणारा नाही असाही उल्लेख खेडेकर यांनी या पत्रात केला आहे.
त्यामुळे या सगळ्याचा विचार करून शासनाने ही औषधे अल्प दरात तसेच दारीद्र्य रेषेखालील रुग्णांस मोफत उपलब्ध करून द्यावीत जेणेकरून गरीब व गरजू नागरीकांचेही जीव वाचू शकतील. तरी आपण या बाबीचा गांभार्याने विचार करावा अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.