चिपळूण – चिपळूण येथील नगरपरिषदेने तीन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या अत्याधुनिक अग्निशमन बंबाच्या मुख्य पंपात बिघाड झाला आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून या बंबाला दोन पोर्टेबल पंप बसविण्यात आले आहेत. जोपर्यंत मुख्य पंपातील पीटीओची यंत्रणा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत या दोन पोर्टेबल पपांवर वेळ मारून न्यावी लागणार आहे.
चिपळूण नगरपालिकेने गेल्या चार वर्षांपूर्वी नगर परिषद अधिनियम ५८(२) च्या आधारे धोरणात्मक निर्णय घेतले. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन बंब खरेदीचाही समावेश होता. सुमारे ४४ लाख रुपये खर्चातून खरेदी केलेला अत्याधुनिक अग्निशमन बंबही तितकाच वादग्रस्त बनला होता. इंदोरहून हा बंब पुरविण्यात आला होता. मात्र आता या बंबाच्या मुख्य पंपात बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर नगर पालिकेच्या अग्निशमन बंबावर दोन पोर्टेबल स्वरुपाचे पंप बसविले आहेत. त्याद्वारेच आग विझविण्याचे काम केले जात आहे. शहरातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा अंदाज घेऊन या बंबाची मागणी करण्यात आली होती. तसेच चिपळूण शहरापासून काही अंतरावर खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहत, लोटे औद्योगिक वसाहतीसाठी या बंबाचा नेहमी उपयोग होतो, तर कधी कधी खेड, संगमेश्वर येथील एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत चिपळूण नगर पालिकेच्या बंबाचा आधार घेतला जातो. मात्र आता अग्निशमन बंबाच्या मुख्य पंपातच बिघाड झाल्याने त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.