बातम्या शेअर करा


गुहागर – जिल्ह्यात कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादूर्भावाची साखळी तुटल्या तुटत नसली तरी बाहेरुन येणारी वाहने, चाकरमानी यांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांची साखळी तुटलेली दिसून येत आहे. चिपळूण-गुहागर मार्गावरील मार्गताम्हाने बोऱ्याफाटा येथे मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेला अशाप्रकारचा तपासणी नाका याचे ज्वलंत उदाहरण ठरला आहे. गेले महिनाभर हा तपासणी नाका बंद असून गुहागर तालुक्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रोगाच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा नाका सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मुंबई, ठाणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना रोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन तेथील चाकरमान्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना गावाकडे आणण्याचा राजकीय खटाटोप झाल्यानंतर बहुसंख्य चाकरमानी आपल्या गावाकडे येऊ लागले होते. एप्रिलपासूनच ही प्रक्रिया सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर अनेक चाकरमानी गुहागर तालुक्यात आपल्या गावाकडे येणार होते. त्यांची तपासणी व वाहनांची चौकशी यासाठी सुरुवातीला मार्गताम्हाने गावाच्या जवळपास हा तपासणी नाका उभारण्यात आलेला होता. सुरुवातीला एका खासगी शेडमध्ये तात्पुरता निवारा म्हणून हा तपासणी नाका सुरु झाला होता. मात्र, मार्गताम्हानेच्या भर वस्तीत व गजबजलेल्या ठिकाणी हा नाका असल्याने व चाकरमान्यांच्या वाहनांच्या तपासणीसाठी लांबच लांब रांगा लागत असल्याने अखेर हा तपासणी नाका येथून हलविण्यात आला होता.
यानंतर हा तपासणी नाका गुहागर-चिपळूण मार्गावरील गुहागरच्या हद्दीवर मार्गताम्हाने बोऱ्याफाटा येथे नेण्यात आला. मात्र, येथे कोणतीही निवाऱ्याची व बसण्याची व्यवस्था नसल्याने हा नाका राजकीय चर्चेत आला होता. हा नाका निर्जन ठिकाणी असल्याने व तेथे बसण्यासाठी शेड व वीजही नसल्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या कोरोना योध्दांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे येथील तपासणी नाक्याचा मोठा गाजावाजा करण्यात आलेला होता. अखेर येथे तात्पुरती पत्र्याची शेड उभारण्यात आली व तेथील अधिकाऱ्यांना रात्रीच्यावेळी जनरेटर व वीज, पाणी आदींची सोय करण्यात आलेली होती. मात्र, पावसाळा सुरु झाल्यानंतर हा तपासणी नाका बंद करण्यात आला तो आजतागायत. गेले दोन महिने गजबजलेला बोऱ्या फाटा हा परिसर पुन्हा एकाकी व निर्जन दिसू लागला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पुणे शहरांसह रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गुहागर तालुक्यात तर कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच अद्यापही लाँकडाऊन संपलेला नाही. अनेक चाकरमानी व खासगी वाहने यांची ये-जा सुरुच आहे. असे असताना मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेला हा तपासणी नाका आता बंद का, असा सवाल उपस्थित होत आहे.

वाहनांवरील कारवाई गारठली
लाँकडाऊन कालावधीत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी, बोऱ्यापाटा अशा मुख्य ठिकाणी दुचाकीसारख्या वाहनांवर मोठी कारवाई सुरु करण्यात आलेली होती. हेल्मेट नसणे, विनाकरण फिरणे, मास्क न वापरणे आदी कारणांनी ही कारवाई वाहतूक पोलिसांकडून सुरु होती. मात्र, ही सर्व कारवाई पावसात गारठलेली दिसून येत आहे. त्यामुळे चिपळूण-गुहागर मार्गावरील अशा पध्दतीने सुरु असणाऱ्या वाहतुकीला कोणतीही शिस्त नसल्याचे बोलले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here