गुहागर बायपास रस्त्याला येणार नवा लूक! डांबरीकरणासाठी ५ कोटीचा निधी, आमदार जाधवांच्या प्रयत्नांना यश

0
260
बातम्या शेअर करा


चिपळूण– गेले काही वर्ष प्रशासकीय जोखंडात अडकडुन दुर्दशा झालेला व अपघातांना निमंत्रण देणारा येथील गुहागर बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार भास्कर जाधव यांनी यासाठी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या रस्त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याची दुरुस्ती तसेच दोन्ही बाजूला वॉकिंग ट्रॅक तयार करून येथील मोठा चढ ही काढण्यात येणार आहे. भविष्यात हा रस्ता गुहागर बिजापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.


गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून चिपळूणमधील गुहागर बायपास रस्ता वादात सापडला आहे. गुहागर विजापूर मार्ग चिपळूण शहर बाजारपेठेतून नेण्यासाठी विरोध झाल्यानंतर येथील बायपास मार्ग गुहागर विजापूर मार्गामध्ये अंतर्भूत करून येथूनच हा मार्ग थेट मुंबई गोवा महामार्गाला जोडण्यात यावा असा निर्णय घेऊन हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग देखील करण्यात आला. त्यानुसार आराखडा देखील तयार करण्यात आला होता. परंतु नंतर मात्र वरिष्ठ पातळीवरून थेट वेगळा निर्णय झाला. गुहागर विजापूर मार्ग पुन्हा एकदा चिपळूण शहर बाजारपेठेतूनच तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले होते.साहजिकच गुहागर बायपास मार्ग पूर्णपणे अडचणीत सापडला आणि रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाले. रस्ता खड्डेमय होऊन रोज अपघात होऊ लागले. या रस्त्यावरून वाहने चालवणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे अर्ज विनंत्या,आंदोलनाचा इशारा असे सर्व प्रयत्न केले गेले.
परंतु रस्ता महामार्ग विभागाकडे वर्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्तीसाठी निधी खर्च करू शकत नव्हते. तर गुहागर बिजापूर प्रकल्पातून हा रस्ता बाजूला केल्याने महामार्ग विभागाला देखील रस्ता दुरुस्ती करणे कठीण बनले होते.
अशा परिस्थितीत आमदार भास्कर जाधव यांनी या विषयात लक्ष घातले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन यासंदर्भात लक्ष वेधले. गुहागर बायपास रस्ता कोणत्याही परिस्थितीत दुरुस्त झाला पाहिजे अन्यथा मला माझ्या पद्धतीने विषय हाताळावा लागेल, असा स्पष्ट इशाराच जाधव यांनी दिला होता. अखेर या रस्त्याबाबत मार्ग काढण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली असून ५ कोटी रुपये इतका निधी देखील मंजूर केला आहे. तसेच या रस्त्याला प्रचंड चढ असून तो देखील काढण्यात येणार आहे. येथे सकाळी व सायंकाळी शेकडो नागरिक वॉकिंगसाठी जात असतात. त्यामुळे दोन्ही बाजूला वॉकिंग ट्रॅक असावा ही आमदार जाधवांची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. भविष्यात हा रस्ता गुहागर विजापूर प्रकल्पात समाविष्ट करण्यासाठी देखील प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चिपळूण मधील गुहागर बायपास रस्त्याचा गुंता सुटून दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here