बातम्या शेअर करा

खेड –  कोकणात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाउस पडत आहे. या पावसाने काल खेड तालुक्यातील नारंगी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या तालुक्यातील चाकाळे येथील ४० हून अधिक शेतकरी अडकले अखेर स्थानिक तरूणांनी मानवी साखळीद्वारे त्या सर्व शेतकऱ्यांना सुखरूपरित्या बाहेर काढले. हा थरार तब्बल दोन तास सुरू होता. तरूणांच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

काल दिवसभर खेड तालुक्यात मुसळधार पाउस पडत होता. या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास जगबुडी व नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नारंगी नदी सभोवतालची भात शेती पुराच्या पाण्यात अडकली. यावेळी चाकाळे येथील शेतकरी चाकाळे व चिंचघर दरम्यानच्या खलाटीत भात लावणीसाठी गेले होते. अचानक पावसाचा जोर वाढून भात शेती पाण्याखाली गेली. भात लावणीसाठी गेलेले चाकाळे येथील ४० हून अधिक शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले. सायंकाळी उशिरापर्यंत हे शेतकरी घरी न परतल्याने ग्रामस्थांनी खलाटीत धाव घेतली. याचदरम्यान, सर्व शेतकरी पुराच्या पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर साऱ्यांचीच धावाधाव सुरू झाली. स्थानिक तरूणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मानवी साखळी तयार केली. तरूणांनी प्रसंगावधान राखत सर्व शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. यामध्ये महिलांचाही समावेश होता. सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here