चिपळूण – चिपळूण शहरात जुलै महिन्यात आलेल्या महापुरासंदर्भात चिपळूण नगर परिषद प्रशासन व पाटबंधारे विभागाला जबाबदार धरून संबंधितांकडून झालेल्या निष्काळजीपणाबाबत जाब विचारण्यासाठी स्थापन झालेल्या चिपळूण बचाव समितीने नगरपरिषद व पाटबंधारे कार्यालयावर धडक देत घंटानाद केला. या प्रकरणी संबंधितांना निवेदन देखील दिले. यासंदर्भात चिपळूण बचाव समितीने मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना निवेदन दिले. यानुसार, महापुरापूर्वी व महापुरानंतर केलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांसमोर श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी केली.
शहरात दरवर्षी पूर येतो. याची दखल घेऊन शहरातील नदी नाले, पन्हे गाळाने भरले असताना या बाबत कोणती कामे केली? तसेच शासनाकडे कोणते आवश्यक प्रस्ताव पाठविले? २२व २३ जुलै रोजी महापूर आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवसांचा रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यामुळे नागरिकांना सतर्क का केले नाही? स्थानिक प्रशासन म्हणून न.प.ने जीवरक्षक सुविधा, बोट, इंजिन आदींचे योग्य नियोजन का केले नाही? महापुरानंतर साठ दिवस उलटले असतानाही शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांचे दोन हजार कोटींचे नुकसान व काही प्रमाणात जीवितहानी झाली आहे. न.प.ने पूर प्रतिबंधतेसाठी शासनाकडे कोणते प्रस्ताव पाठविले व केलेल्या उपाययोजनांचा पाठपुरावा केला का याची माहिती मिळावी. अद्यापही नाले, पन्हे व गटारे तुंबली आहेत. यावरून प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. या बाबत जाहीर निषेध करून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी राम रेडीज, शिरीष काटकर, किशोर रेडीज, अरुण भोजने, शाहनवाज शाह, राजेश वाजे, चिपळूण बचाव समितीचे सदस्य, नागरिक व व्यापारी उपस्थित होते.