गुहागर ; आय काँग्रेस अद्यापही ‘आयसोलेशन’ वॉर्डात…

0
149
बातम्या शेअर करा

गुहागर – कोवीड आपत्ती, इतर सामाजिक उपक्रमात गुहागर तालुक्यात विविध पक्षांनी आपल्यापरिने भरारी घेतली असली तरी इतर पक्षांपासून अलग असलेल्या व गुहागर तालुक्यात औषधालाही शिल्लक नसलेला येथील आय काँग्रेस पक्ष अद्यापही आयसोलेशनमध्ये असलेला दिसून येत आहे. तालुक्यातील लहान-मोठ्या पक्षांनीही थोडीफार प्रगती केलेली असताना येथील काँग्रेस मात्र, मरणासन्न अवस्थेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

गुहागर तालुक्यात राजकीय पक्षांची घोडदौड पहाता प्रथम क्रमांकावर शिवसेना, द्वितीय क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या खालोखाल आपले मनापासून काम करणारा महाराष्ट नवनिर्माण सेना होय. तसे पाहिले तर आय काँग्रेस केवळ गुहागर तालुक्यातच नाही तर पूर्णतः कोकणात मरणासन्न अवस्थेत असलेली दिसून येत आहे. गुहागरपुरते लक्षात घेतले असता काही महिन्यांपूर्वी आय काँग्रेसची तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. मात्र, यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केवळ लेटरपँडवरील नावापुरत्याच राहिल्या आहेत. एकही सामाजिक उपक्रम किंवा काम पदाधिकाऱ्यांकडून झालेले नाही.

गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या आमदार भास्कर जाधव यांनी येथील शिवसेनेला नवसंजीवनी दिली. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्यात पोरका झाला. मात्र, खासदार सुनील तटकरेंच्या रुपाने तालुक्यात राष्ट्रवादी जीवंत ठेवण्यासाठी किमान प्रयत्न तरी या पक्षाकडून करण्यात आले. तालुक्यात बहुतांश पक्ष शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व मनसे कोणत्या ना कोणत्या कारणांनी प्रकाशझोतात असल्याचे पहायला मिळत आहेत. गेले दीड वर्षे कोवीड आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या पक्षांनी आपल्यापरिने कामे केलेली आहेत. या पक्षांकडून सँनिटायझर, आर्सेनिक गोळ्यांचे वाटप, मास्क, गरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप, वादळग्रस्तांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न, इतर उपक्रम राबविले आहेत. यातील प्रमुख तीन पक्ष सोडले तर मनसेसारखा तालुक्यात अगदीच नगण्य असलेल्या पक्षाने अलिकडे सामाजिक उपक्रमात भरारी घेतलेली दिसून येत आहे.

गुहागर तालुक्यात कितीतरी समस्या, जनतेच्या विकासाचे प्रश्न पडून आहेत. गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात तर गुहागर-चिपळूण मार्गावर वाहनचालक व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रुंदीकरणाची अपुरी कामे, जमीनदारांचा अधांतरी असलेला मोबदला, वर्षभर मोडकाघर पुलाचे भिजत पडलेले घोंगडे, तालुक्यात उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई, विजेच्या समस्या असे कितीतरी विषय घेण्यासारखे असताना किती पक्षांनी यावर आवाज उठविलेला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. गुहागर आय काँग्रेससही याबाबत नेहमीच उदासीन असून नियुक्ती करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीला याचा कोणताच मागमूस नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

गुहागर आय काँग्रेस केवळ नावालाच शिल्लक असल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. मनसेसारख्या छोट्या प्रादेशिक पक्षाने गुहागरात गेले वर्षभर आपली घोडदौड सुरु ठेवली आहे, मात्र, राष्ट्रीय पातळीवरच्या या काँग्रेस पक्षाला अजूनही गुहागरात बाळसे धरता आलेले नाही, हे विशेष. नव्या नियुक्त झालेल्या कार्यकारिणी सदस्यांनी आपल्या पक्षाला गुहागरमध्ये संजीवनी देऊन किमान जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here