खेड -(प्रसाद गांधी ) खेड तालुक्यातील सुकिवली बौध्दवाडी येथे खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचुन गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपी आकाश जाधव याच्यावर धाड टाकुन त्याला २२५०० /- रुपये किंमतीच्या दीड किलो वजनाच्या गांजासह रंगेहाथ पकडले.
सुकीवली बौध्दवाडी येथील आकाश जाधव हा आपला साथीदार अनिल चव्हाण यांच्यासह गांजा विक्री करत असल्याचे खात्रीलायक वृत्त खेड पोलिसांना मिळाले होते. यावेळी खेड पोलिसांनी सापळा रचून या दोघांना गांजा हा अंमली पदार्थ बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ पकडले. यावेळी आकाश जाधव याला खेड पोलीसांनी अटक केली. मात्र त्याचा साथीदार अनिल चव्हाण उर्फ अनिल बुवा याला पोलीसांची चाहुल लागताच त्याने त्याचे ताब्यातील लाल रंगाची ऍक्टिव्हा गाडी क्रमांक एमएच-०८-एडब्ल्यु-५६४५ सदर ठिकाणी सोडून काळोखाचा फायदा घेवुन घनदाट जंगलामध्ये पळ काढला. या कारवाईमध्ये आरोपींकडून गांजा हा अंमली पदार्थ, दुचाकी वाहन, मोबाईल फोन, तसेच अंमली पदार्थ विक्रीसाठी आवश्यक इतर साहित्य असा एकुण ९८,८४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपीविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ (एन. डी. पी. एस. कायदा) कलम ८ (क). २० (ब) (२) २२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपीत आकाश जाधव याला अटक करण्यात आले असून त्याचा साथीदार अनिल चव्हाण उर्फ अनिल बुवा याचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि सुजित गडदे हे करीत आहेत.
ही कारवाई खेड पोलीस स्थानकाचे तपास पथक प्रमुख स. पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस नाईक विरेंद्र शांताराम आंबेडे, पोलीस शिपाई संकेत गुरव, साजिद नदाफ, अजय कडु यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी त्यांना पोलीस पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी मार्गदर्शन केले.