गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळीत येथे महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या 25 ग्रामस्थांची तपासणी केली. त्यामध्ये 4 ग्रामस्थ कोरोनाग्रस्त होते. याशिवाय तालुक्यात 3 दुकानदार आणि 14 वाहनचालकांवरही थेट दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे 13 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यात संचारबंदी लागून देखील तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तहसीलदार सौ. लता धोत्रे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. देवीदास चरके आणि पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम यांनी शृंगारतळीत धडक कारवाई केली. रस्त्याच्या कडेलाच कोरोना तपासणी केंद्र उभे केले. अधिकारीच रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवू लागले. प्रत्येकाची अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाभरे गावातील 2, पाली, दाभोळ मधील प्रत्येकी 1, असे 4 ग्रामस्थ कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. हे सर्वजण तरुण असल्याने त्यांना स्वगृही विलगीकरणात रहाण्याच्या सूचना देवून घरी पाठवण्यात आले आहे.
गुहागर पोलीसांनी पोलीस निरिक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानदार आणि वहातुकदार यांच्यावर कारवाई केली. वेळंब रोड ते पालपेणे रोड दरम्यान सुरु असलेल्या प्रत्येक दुकानात जावून पोलीस आरटीपीसीआर चाचणी न करता वहातूक करणाऱ्या तसेच मोटार अधिनियम कायद्याने आवश्यक कागदपत्रे गाडीत नसलेल्या 10 वहातुकदारांकडूनही प्रत्येकी 1000 रु. दंडाची कारवाई केली. तर ४ दुचाकी चालकांकडून प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे पोलीसांनी दंड वसुल केला. या कारवाईमध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु कांबळे, वैभव चौघुले व मोहिते सहभागी होते.