रत्नागिरी – सध्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांमुळे संसर्ग वेगाने वाढत आहे. भविष्यात ही संख्या सध्याच्या चौपट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी मुंबईहून येणाऱ्यांनी महत्त्वाचे कारण असेल तरच यावे, अन्यथा सध्या येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी प्रत्येक नाक्यावर होणार असून, व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.