रत्नागिरी – राज्यात आजपासून लॉकडाऊन असतानाही रत्नागिरी शहरात अनावश्यक फिरणाऱ्या १०२ नागरिकांच्या पोलिसांनी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामुळे पोलिसांच्या ब्रेक द चेन अभियानाला बळ मिळत असून अनावश्यक फिरणाऱ्यांनासुद्धा चाप बसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १४ एप्रिलपासून निर्बंध घोषित केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात कडक लॉक डाऊन घोषित केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अंमलबजावणीसाठी बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून सज्ज झाले. रत्नागिरी शहरातील प्रमुख ठिकाणी तसेच जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. तर गुरुवारी सकाळपासूनच पोलिसांनी लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने कोणीही अनावश्यक फिरू नये असे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी यापूर्वीच सांगतिले असताना गुरुवारी अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आले. अशाना चाप लावतानाच ब्रेक द चेन हे यशस्वी होण्यासाठी पोलिसांनी अशा अनावश्यक फिरणार्या लोकांची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली. चिपळूण सह रत्नागिरीमध्येही लोकांची टेस्ट करण्यात आली. दुपारपर्यंत रत्नागिरीमध्ये १०२ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये ३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.