खेड – खेड तालुक्यातील कळंबणी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात नसल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी होत होत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात कोरोनाचा कहर असल्याने हे रुग्णालय रुग्णांसाठी संजीवनी ठरणारे आहे मात्र येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या जीवाशी खेळत असतील तर रुग्णालयात दाखल होण्याऱ्या रुग्णांचा वाली कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई -गोवा महामार्गालगतच्या कळम्बनी येथे असलेले उपजिल्हा रुग्णालय हे खेड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, तसेच मंडणगड तालुक्यातील जनतेसाठी संजीवनी ठरणारे आहे. या रुग्णालयात अत्यावश्यक त्या सुविधेची उपकरणेही उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळायला काहीच हरकत नाही. मात्र या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी रुग्णांची योग्य प्रकारे देखभाल करत नसल्याने या ठिकाणी उपचार घ्यायला जायचे की नाही याचा विचार रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना करावा लागतो आहे.
या रुग्णालयाचा ०२३५६ – २६४५१० हा दूरध्वनी क्रमांक आहे. मात्र हा क्रमांक गेले कित्येक वर्ष मृतावस्थेत आहे. त्यामुळे या रुग्णालयात कुणाशी संपर्क साधायचा असेल तर तो साधने शक्य नाही. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर कॉल करायचा विचार केला तर ते ही शक्य नाही. एकतर या ठिकाणी कोणत्याही नेटवर्क कंपनीचे नेटवर्क नाही आणि असेल तर येथील वैद्यकीय अधीकारी कायम नॉट रिचेबल असतात त्यामुळे एखाद्या इमर्जन्सीच्या वेळेला रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांनी करायचे काय हा प्रश्न निर्माण होतो.
गेल्या बुधवारी थंडी ताप असलेल्या एका युवकाला या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या तापाची लक्षणे कोरोनासदृश असल्याने त्याची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. रिपोर्ट यायचा असल्याने त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. या दरम्यान त्याला जबरदस्त थंडी वाजत होती. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. तो युवक उपचारांसाठी वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस यांना ओरडून ओरडून सांगत होता मात्र त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. त्याच्या नातेवाईकांना हे कळल्यानंतर त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सगरे यांच्याकडे सातत्याने संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला मात्र त्यांनी आपला मोबाईल क्रमांक डायव्हर्ट करून ठेवला होता. रुग्णालयातील अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला मात्र जातो, सांगतो या पलीकडे ते देखील काहीही करू शकले नाहीत. अखेर त्या युवकाच्या नातेवाईकांनी वैतागून त्या युवकाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात त्या युवकावर तात्काळ उपचार सुरु झाले आणि तो वाचला. जर त्या युवकाला त्याच्या नातेवाईकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलविले नसते तर अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
शासनाने तालुक्या तालुक्यात स्थापन केलेली रुग्णालये हे जनतेला आरोग्य सुविधा मिळावी यासही स्थापन केली आहे. या रुग्णालय काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन त्यासाठीच पगार देत आहे मात्र शासनाचा हजारो रुपये पगार घेणारे अधिकारी रुग्णांवर उपचार करण्याकडे मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले शासकीय रुग्णालयात काम करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर योग्य प्रकारे उपचार करायलाच हवेत. त्यांचे ते कामच आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची विशेष खबरदारी घ्यायला हवी. परंतु जर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असेल तर ते योग्य नाही. तसं काही होत असेल तर त्याची चौकशी केली जाईल असे त्यानी स्पष्ट केले